अटल सेतूला तडे? MMRDA, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणाले, तो सर्व्हिस रोड, अफवा पसरविली जातेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:42 PM2024-06-21T20:42:15+5:302024-06-21T20:42:55+5:30
MMRDA Reaction on Atal Setu Cracks: हा रस्ता कोस्टल रोड न बनविल्याने शेवटच्या क्षणाला बनविला गेला होता. हे छोटे क्रॅक आहेत, ते उद्यापर्यंत भरले जातील. यामुळे वाहतुकीला कोणताही धोका नाही, असे गणात्रा यांनी सांगितले.
अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला हे तडे गेले असून अटल सेतूला नाही, असा खुलासा अटल सेतू पॅकेज ४ चे स्ट्राबैग कंपनीचे प्रकल्प अधिकारी कैलास गणात्रा यांनी केला आहे. एमटीएचएल पुलाला तडे गेल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे ते म्हणाले.
उलवे येथून अटल सेतूवर येण्यासाठी जो सेवा रस्ता आहे त्या रस्त्याला हे तडे गेलेले आहेत. ही खाडीची जमीन आहे. यामुळे पावसाने माती खचते, असे ते म्हणाले आहेत. 20 जून 2024 रोजी ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने केलेल्या तपासणीदरम्यान रॅम्प 5 (मुंबईच्या दिशेने जाणारा उतार) वर तीन ठिकाणी रस्त्याकडेला हे तडे गेलेले आहेत, असे ते म्हणाले. एमएमआरडीएने गणात्रांचा व्हिडीओ पोस्ट करत या अफवा पसरविल्या जात असल्याचे म्हटले आहे.
हा रस्ता कोस्टल रोड न बनविल्याने शेवटच्या क्षणाला बनविला गेला होता. हे छोटे क्रॅक आहेत, ते उद्यापर्यंत भरले जातील. यामुळे वाहतुकीला कोणताही धोका नाही, असे गणात्रा यांनी सांगितले.
There have been rumours circulating about cracks on the MTHL bridge. We want to clarify that these cracks are not on the bridge itself but on the approach road connecting MTHL from Ulwe towards Mumbai.#RebootingMumbai#ReshapingMMR@DrSanMukherjeepic.twitter.com/Nc62bwrjzU
— MMRDA (@MMRDAOfficial) June 21, 2024
यामुळे अटल सेतूच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या भेगाळलेल्या अटल सेतूच्या रस्त्याची पाहणी केली आहे. हा मुद्दा विधानसभा निवडणूक आणि पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना विरोधी पक्ष हातात घेण्याची शक्यता आहे.
‘अटल सेतू’ १३ जानेवारीपासून सकाळी ८ वाजेपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सुरुवातीला छोट्या वाहनांसाठी ५०० रुपये टोल जाहीर झाला होता, तो नंतर कमी करून २५० रुपये करण्यात आला. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना २५० रुपयांपासून १५८० रुपये एकेरी प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. या महागड्या टोलमुळे सरकारवर टीकाही झाली होती. सेतू विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगडला जोडला गेला आहे. यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा त्रास कमी झाला आहे.