'दादा अन् माझं नातं...'; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षातील बंडावरही बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:04 AM2023-07-03T00:04:31+5:302023-07-03T00:05:43+5:30
शरद पवार यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, मी आता यावर अधिक बोलणं संयुक्तिक ठरणार नाही
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांसमवेत भाजपसोबत जात असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी अचानकपणे दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या आणखी ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात झालेला हा भूकंप महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा ठरला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना या शपथविधीला आपलं समर्थन नसल्याचे जाहीर केले. तसेच, उद्याच आपण कराडमधील प्रितीसंगमावर जाऊन जनतेशी संवाद साधायला जात असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, मी आता यावर अधिक बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. मात्र, शरद पवारांना आणि मलाही आमदारांचे फोन आले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच, अजित पवार दादा आणि माझं नातं हे कौटुंबिक आहे. आमचं कौटुंबिक नातं वेगळं आणि प्रोफेशनली नातं, राजकीय जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. आम्हा दोघांनाही ते चांगलं समजतं, तेवढी वैचारिक प्रगल्भता आमच्यात आहे. यापुढे आमचं कौटुबिंक नातं आणि प्रोफेशनल नातं यात गल्लत होणार नाही. मग, माझा भाऊ म्हणून दादा आजही मला तितकाच प्रिय आहे, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
पक्षात घडलेल्या बंडावरील प्रश्नांना उत्तर देताना, आत्ताच काही सांगता येणार नाही. अजून या घटनेला १२ तासही झालेले नाहीत. त्यामुळे, हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि काय भूमिका कधी घ्यायच्या हेही समजेल, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय म्हणाले जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभा सदस्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याकडून देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत आदरणीय शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. तसेच, देशातील ९ राज्यात पक्ष फोडाफोडीचं असं राजकारण भाजपाकडून होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.