दादांचा पाॅवरगेम! अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यात साडेतीन वर्षांत तिसरा राजकीय भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 06:01 AM2023-07-03T06:01:47+5:302023-07-03T06:02:21+5:30
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे ९ मंत्री सहभागी
मुंबई : अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर रविवारी खरी ठरली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांनी नऊ जणांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
रविवारी सकाळी पवार यांनी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या निवडक आमदारांची बैठक बोलवली होती. जे सोबत येऊ शकतात, अशाच आमदारांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. तिथे सरकारला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली आणि पाठिंब्याचे पत्र तयार होऊन त्यावर उपस्थित आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या. ही बैठक सुरू होती तेव्हा सुप्रिया सुळे देवगिरीवर पोहाेचल्या. त्यांनी अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, यश येत नसल्याने नाराज सुप्रिया बाहेर पडल्या.
दुपारी दोननंतर अजित पवार आणि भुजबळ यांचे पीए राजभवनवर पोहचले. पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवार, प्रफुल्ल पटेल आणि समर्थक आमदार पोहचले. तिथे शपथविधीची सर्व तयारी झाली होती. थोड्या वेळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारही पोहोचले. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगुंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व अन्य काही नेतेही दाखल झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या नऊ सहकाऱ्यांचा शपथविधी पार पडला.
विकासावर विश्वास
आमचे नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो! याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्वांचेसुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
गळचेपी होते तेव्हा...
पक्षात जेव्हा एका चांगल्या कार्यकर्त्याची, नेत्याची गळचेपी होते, त्याला दुय्यम वागणूक मिळते तेव्हा अशा घटना घडतात. आता महाविकास आघाडीची बोट फुटलेली आहे. जे देशाची मोट बांधायला निघाले होते त्यांची बोट फुटली आहे. अजित पवार फुटलेल्या बोटीतून आता विकासाच्या बोटीत बसले आहेत. अजित पवारांमुळे आता डबल इंजिनचे सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. राज्यात आधी शिवसेना आणि भाजपच्या रुपाने डबल इंजिन सरकार काम करत होते. अजित पवारांच्या येण्याने आता हे ट्रिपल इंजिन सरकार झाले आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
२-३ दिवसात परत येतील
हा अनुभव नवा नाही. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले अनेक सदस्य येत्या २-३ दिवसांत परत येतील. सोमवारी कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी लोकांमध्ये जाणार आहे. - शरद पवार
राष्ट्रवादी काॅंग्रेसवर अजित पवारांचा दावा
आम्ही घेतलेला निर्णय बहुतेक आमदारांना मान्य आहे, पक्ष आमच्याबरोबरच आहे. सगळ्या जणांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. आकडा सांगायला मटक्याचा आकडा काढायचा नाही, असे सांगत आपल्याबरोबर किती आमदार आहेत याचा आकडा अजित पवारांनी गुलदस्त्यात ठेवला.
मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाताेय
१९८४ नंतर देशात कोणी नेता घडला नाही ज्याच्या नेतृत्वात देश पुढे गेला आहे. मात्र मागील ९ वर्ष मोदींच्या नेतृत्वात देश सक्षमपणे पुढे जात आहे. परदेशातही ते प्रसिद्ध आहेत, त्यांना मानसन्मान मिळतो आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री
हा पक्षाचा सामूहिक निर्णय : प्रफुल्ल पटेल
सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय आम्ही पक्ष म्हणून तसेच सामूहिक घेतला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच, हा निर्णय कोणत्याही दबावाखाली घेतलेला नाही, असेही ते म्हणाले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीत मी केली होती, त्यामुळे पक्षविरोधी काम केल्याबद्दल मी त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत विचारले असता पटेल म्हणाले की, शरद पवार जे बोलले त्यावर मी काही बोलणार नाही. पक्षाने मला आजपर्यंत जी संधी दिली त्याबाबत मी पक्षाचा आणि शरद पवारांचा आभारी आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे.