महाविकास आघाडीत चाललंय तरी काय?; सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये 'या' कारणावरुन झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:37 PM2020-01-07T16:37:21+5:302020-01-07T16:42:12+5:30
त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेत आला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. मात्र तीन वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या या पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज कॅबिनेट बैठक होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट बैठकीवेळी बसण्याच्या खुर्चीवरुन भुजबळ आणि चव्हाण यांच्यात वाद झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र भुजबळ-चव्हाण यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद झाला नसल्याचं मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. तत्पूर्वी आपल्याला दुय्यम दर्जाची खाती दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. विरोधी पक्षनेतेपद सांभाळल्यानंतर अशाप्रकारे महत्वाचे खाते देताना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवरुन राजीनामा दिल्याचं वृत्त होतं. त्यावेळी ठाकरे सरकारच्या पतनाची सुरुवात झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्रिपद दिल्याने सत्तारांनी हे पाऊल उचललं अशी चर्चा होती. मात्र माझ्या राजीनाम्याच्या बातम्या ही विरोधकांनी सोडलेली पुडी असून अफवा आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यातही खडाजंगी झाल्याची माहिती होती. काँग्रेसला कृषीखाते हवं होतं कारण अशोक चव्हाण आणि बाळासाहोब थोरात यांना मोठी खाती द्यायची होती. यावेळी महाविकास आघाडीच्या चर्चेत अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विषय काढला होता. यावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेत ते मंत्रीमंडळात नाहीत. मग त्यांचा इथे संबंध काय असा प्रश्न विचारला. यानंतर अजित पवारांनीही आधी तुमचा नेता ठरवा, मग बोलू, असे म्हटल्यानं चव्हाण तेथून निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते.