नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार, फडणवीसांचा विधानसभेत घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:59 AM2020-02-25T11:59:34+5:302020-02-25T12:06:22+5:30
budget session of Maharashtra Assenbly : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्याावरून सरकारला धारेवर धरले
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मागणीवरून विधानसभेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्याावरून सरकारला धारेवर धरले. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कधी करणार, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.
आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. ''राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र या कर्जमाफीचा लाभ यावर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. सरकारने जाहीर केलेली ही कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावी कधीपर्यंत होईल, याची तारीख सरकारने सांगावी,'' असे फडणवीस म्हणाले.
तसेच या सरकारमधील नेते सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन देत होते. आता शेतकऱ्यांचा सातबारा कधीपर्यंत कोरा होणार. लाभ यावर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार अशी विचारणा फडणवीस यांनी केली.''
संबंधित बातम्या
खुशाल श्वेतपत्रिका काढा, कोणत्याही चौकशीला घाबरत नाही- देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक; काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली टीका
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाने विधानसभेत जोगदार गोंधळ घातला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाने स्थगन प्रस्ताव देत चर्चेची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्याने भाजपाचे आमदार हौद्यात उतरून घोषणाबाजी करू लागले.