ट्विटरवरील कौतुक सोहळ्याने देवरांच्या पक्षांतराच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:43 AM2019-09-25T03:43:14+5:302019-09-25T07:10:47+5:30
खुलाशानंतरही उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळेना
मुंबई : यशस्वी अमेरिका दौऱ्याबद्दल काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे ट्विट केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा देवरांना टॅग करत ट्विटद्वारे उत्तर दिले. दोन्ही नेत्यांमधील या ट्विटर संवादानंतर मिलिंद देवरासुद्धा भाजप प्रवेश करणार का, या चर्चांना उधाण आले. दिवसभर संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर मंगळवारी सायंकाळी स्वत: देवरा यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपण कुठेच जाणार नसल्याचे स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि ह्युस्टन येथील भाषण यशस्वी ठरल्याचे ट्विट देवरा यांनी सोमवारी केले होते. या दोन्ही देशांतील संबंध सुदृढ असावेत यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माझे वडील मुरली देवरा आघाडीवर होते, अशी आठवणही मिलिंद देवरा यांनी या वेळी सांगितली. त्यांच्या या ट्विटचे सत्ताधारी भाजपमधील केंद्रीय मंत्री आणि नंतर स्वत: पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले. दोन्ही देशांतील संबंध सुदृढ राहावे यासाठी माझे मित्र दिवंगत मुरली देवरा कायमच प्रयत्नशील होते. आज ते असते तर दोन्ही देशांतील दृढ संबंध पाहून ते नक्कीच सुखावले असते, अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी देवरा यांच्या ट्विटला उत्तर देताना व्यक्त केली.
तर केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनीही प्रामाणिक राजकीय प्रतिक्रिया दिल्याबद्दल देवरा यांचा मित्र असा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. ट्विटरवरील या मैत्रीपूर्ण संवादामुळे मिलिंद देवरासुद्धा काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये जाणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. देवरा यांच्या भाजप प्रवेशाच्या या चर्चेवर त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी सायंकाळी ट्विटरवरच देवरा यांनी याबाबत निवेदनाद्वारे खुलासा केला.
‘पक्षीय भिंती ओलांडून मैत्री जपणे अवघड’
वडिलांकडूनच भारत-अमेरिका संबंधांचा वारसा लाभला आहे. मैत्री हा मुरली देवरांच्या राजकारणाचा कणा होता. त्यामुळेच भुलेश्वर ते बोस्टन आणि वाळकेश्वर ते वॉशिंग्टनपर्यंतच्या त्यांच्या मित्रांचा, हितचिंतकांचा गोतावळा मला वारसारूपाने मिळाला. पक्षीय भिंती ओलांडून मैत्री जपणे सध्याच्या काळात अवघड झाले असले तरी मी माझ्या मूळ विचारांशी फारकत घेणार नाही, असे मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले. मात्र, आपल्या या निवेदनात त्यांनी थेटपणे भाजप प्रवेशाचे खंडन करणे टाळल्याने या चर्चा मात्र सुरूच राहिल्या.