संघाची लोकशाही म्हणजे विनोदच; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 06:00 AM2018-09-21T06:00:27+5:302018-09-21T06:00:37+5:30

लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे दिल्लीत आयोजन केले होते.

Democracy is humorous; Congress allegations | संघाची लोकशाही म्हणजे विनोदच; काँग्रेसचा आरोप

संघाची लोकशाही म्हणजे विनोदच; काँग्रेसचा आरोप

Next

मुंबई : लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे दिल्लीत आयोजन केले होते. भागवतांची भाषणे म्हणजे संघाची उद्दिष्टे लपवून ठेवत परस्पर विसंगत विधाने, इतिहासाची मोडतोड करण्याचा उत्तम नमुना असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी गुरुवारी केला. संघ लोकशाहीप्रधान असल्याचे भागवतांचे विधान म्हणजे मोठा विनोद असल्याचाही टोला महाजन यांनी लगावला.
गांधीभवन येथील पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे, असे शहाजोगपणे प्रशस्तिपत्र देणाऱ्या सरसंघचालक भागवतांनी संघाच्या योगदानाबाबत बोलावे. डॉ. हेडगेवारांचा अपवाद वगळता गोळवलकरांपासून सर्व संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची टिंगलटवाळी व विरोध करण्यातच धन्यता मानली, हा इतिहास सर्वांना माहीत आहे. संघ लोकशाहीप्रधान संघटना असल्याचे भागवतांचे विनोदी वक्तव्य मान्य करायचे की एकचालक नेतृत्वाची संघाची कार्यप्रणाली, असा सवालही महाजन यांनी केला. राज्यघटना आणि तिरंगी झेंडा यांचे महत्त्व मोठे असून त्याबद्दल संघाला अभिमानच आहे, असे धादांत खोटे विधान भागवतांनी केले. या दोन्हीविषयी माधव गोळवलकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवरून आपला स्पष्ट विरोध त्या वेळी नोंदवला आहे. संघाच्या मुखपत्रात लेख लिहून त्यांनी त्यावर टीकाही केली होती. घटनेबद्दलही त्यांना आक्षेप होता. त्यांच्या मते भारतीय संस्कृती व परंपरा यांना साजेशी मनुस्मृती उपलब्ध असताना अशा गोधडीछाप घटनेची काय गरज आहे, असा प्रश्न गोळवलकरांनी विचारला होता, असे महाजन यांनी सांगितले.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत आहेत. कामगिरीच्या आधारे निवडणुका जिंकणे शक्य नाही. त्यामुळे पुन्हा राम मंदिराचे भूत उभे करण्यात येत आहे. हिंदू आणि मुस्लीम हे भारतीयच असल्याने त्यांच्यात भेद करणे संघाला मान्य नाही, हिंदू राष्ट्र हे मुस्लिमांशिवाय असूच शकत नाही, असे आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करणारे विधानही भागवतांनी केले. हे खरे असेल तर राम मंदिराच्या बरोबरच त्याच जागेवर त्यांच्या अनुयायांनी पाडलेली बाबरी मशीद पुन्हा बांधून देण्याचा शब्द ते देतील काय, असा सवाल महाजन यांनी केला.
>शाब्दिक कोटी
भागवतांनी पुन्हा एकदा युक्त-मुक्त वगैरे शाब्दिक कोटी केली. याबाबत भागवतांची भूमिका खरेपणाची असेल तर गेल्या पाच वर्षांपासून त्यांनीच पंतप्रधानपदासाठी निवडलेल्या प्रचारकापासून ते गल्लीतल्या स्वयंसेवकांपर्यंत काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना त्यांनी का रोखल्या नाहीत, असा सवालही महाजन यांनी केला.

Web Title: Democracy is humorous; Congress allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.