१०० वर्षे जुनी इमारत पाडा : उच्च न्यायालय; रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:14 AM2022-08-17T07:14:11+5:302022-08-17T07:14:34+5:30

इमारत जीर्ण झाली असल्याने ती धोकादायक आहे. ती पाडणे योग्य आहे,  असा निर्णय पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने घेतला.

Demolish 100-year-old building: High Court; Residents instructed to evacuate | १०० वर्षे जुनी इमारत पाडा : उच्च न्यायालय; रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे निर्देश

१०० वर्षे जुनी इमारत पाडा : उच्च न्यायालय; रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे निर्देश

Next

मुंबई : दक्षिण मुंबईतील १०० वर्षे जुनी ‘एच. एन. पेटीट विडोज होम’ची जीर्ण इमारत पाडण्यास उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. तेथील रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

११ ऑगस्ट रोजी न्या. आर. डी. धानुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मुंबई महापालिकेला १०० वर्षे जीर्ण इमारत पाडण्यास परवानगी दिली. ‘एच. एन. पेटीट विडोज होम’ ही इमारत वर्दळीच्या रस्त्यावर आहे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास जीवितहानी होऊ शकते’, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. इमारत जीर्ण झाली असल्याने ती धोकादायक आहे. ती पाडणे योग्य आहे,  असा निर्णय पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने घेतला.

न्यायालयाने त्यांचा निर्णय योग्य ठरवला. समितीच्या अहवालाच्या आधारे पालिकेने इमारतीच्या मालकाला एप्रिलमध्ये तातडीने इमारत रिकामी करण्यासंबंधी पत्र पाठविले. काही रहिवाशांनी व तळमजल्यावरील गाळेधारकांनी जागा रिकामी करण्यास नकार देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

ग्राउंड प्लस पाच मजल्यांची इमारत १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. विधवांना वसतिगृहाची सुविधा देण्यासाठी या इमारतीचा वापर केला जात असे. इमारत जर्जर झाल्याने तेथे राहणाऱ्या विधवांना २०१९ मध्ये दुसऱ्या वसतिगृहात स्थलांतरित करण्यात आले. ऑक्टोबर २०२१ मध्ये पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने  इमारत धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष काढला. 

न्यायालय म्हणाले...
     भुलेश्वर येथे अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी ही इमारत उभी आहे आणि ही इमारत ज्या ठिकाणी उभी आहे, तेथे लोकांची वर्दळ असते.
    ही इमारत तशीच ठेवण्यास परवानगी दिली तर   इमारतीतील  रहिवाशांच्याच नव्हे, तर तेथून ये-जा करणाऱ्या लोकांच्या जीवितासही धोका आहे.
    इमारतीजवळ  मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित मार्गिका व मेट्रो रेल्वे स्थानक आहे, असे म्हणत न्यायालयाने पालिकेच्या समितीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने इमारतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याचे आदेश दिले.

Web Title: Demolish 100-year-old building: High Court; Residents instructed to evacuate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.