खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह समर्थक NCP आमदारांचा हॉटेलला मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:14 PM2023-07-05T16:14:07+5:302023-07-05T16:15:11+5:30
वांद्रे येथील एमआयटी कॉलेजला आयोजित अजित पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे ३२ आमदार हजर होते.
मुंबई – रविवारी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसह ८ दिग्गज आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी नेत्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवारांनाही धक्का बसला. अजितदादांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत २ गट बनले. यात कुणाच्या पारड्यात किती आमदार याची उत्सुकता सगळ्यांना लागली. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले.
वांद्रे येथील एमआयटी कॉलेजला आयोजित अजित पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे ३२ आमदार हजर होते. तर वायबी सेंटर येथील शरद पवारांच्या बैठकीला पक्षाचे १४-१६ आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे काही आमदार दोन्ही बैठकीला हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळी देवगिरी बंगल्यावर अजितदादा समर्थक आमदार जमले. त्यानंतर तिथूनच या आमदारांनी वांद्रे येथील बैठकीला हजेरी लावली.
Maharashtra | NCP leaders of Ajit Pawar faction being taken to a hotel in a bus, after their meeting at MET Bandra in Mumbai. pic.twitter.com/jdos9Fz4XE
— ANI (@ANI) July 5, 2023
वांद्र्यातील बैठकीला अजित पवार समर्थक आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीला काही आमदार बाहेरगावी असल्याने, आजारी असल्याने आले नसल्याचे सांगण्यात आले. परंतु जितके आमदार आले त्या सर्वांना खबरदारी एकाच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. खुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका बसमधून या सर्व आमदारांना हॉटेलला नेल्याची माहिती आहे. कुठलाही आमदार आता फुटू नये यासाठी अजित पवार गटाकडून काळजी घेतली जात आहे.
तू पुन्हा निवडून कसा येतो बघू?
वांद्रे येथील बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. कालपासून काही आमदारांची शोधाशोध सुरू केली जातेय. अनेकांना फोन केला जातोय. आमदाराने फोन उचलला नाही तर बायकोला फोन केला जातोय. आमदारांना भावनिक केले जातेय. कुणी ऐकले नाही तर यापुढे तू पुन्हा निवडून कसा येतो बघू असं म्हटलं जाते. आम्ही तुम्हाला दैवत मानतो. आम्ही तुमची मुलं मग दैवताने अशा भाषेचा वापर का करावा असा सवाल अजित पवारांनी केला.