"तुम्ही काय मामलेदारांना पाहायला दौरे करता का?", अजित पवारांचं नारायण राणेंना रोखठोक प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:31 PM2021-07-29T13:31:17+5:302021-07-29T13:34:14+5:30
Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका एकेरी उल्लेख करुणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका एकेरी उल्लेख करुणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "काही नेते मंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले, पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहेत?, तहसीलदार कुठे आहेत? याची विचारणा करत बसलो नाही. पण काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती", असं अजित पवार म्हणाले.
"यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशाप्रकारची भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलात की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला आलात? अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का?", असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.
चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं होतं. "सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं.