लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज?; ‘शासन आपल्या दारी’कडे फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:15 PM2023-09-04T12:15:10+5:302023-09-04T12:15:50+5:30

अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने ते कार्यक्रमाला आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

Deputy Chief Minister Ajit Pawar was absent from the 'Shasan Apya Dari' program held in Buldhana. | लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज?; ‘शासन आपल्या दारी’कडे फिरविली पाठ

लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज?; ‘शासन आपल्या दारी’कडे फिरविली पाठ

googlenewsNext

मुंबई : शासकीय योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या बुलढाण्यात झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. फडणवीस लेहला पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गेले होते. मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने ते कार्यक्रमाला आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाला त्या दिवसानंतर अजित पवार एकाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत किंवा ते कोणत्या बैठकीतही सहभागी झाले नाहीत. शनिवार, रविवारी प्रामुख्याने अजित पवार पुणे आणि बारामतीला असतात. मात्र यावेळी ते मुंबईतच आहेत. शुक्रवारी रात्री लाठीमार झाल्यानंतर शनिवारी त्यांनी चाैकशी हाेईल, असे म्हटले हाेते.

‘ते’ दोन दिवसांपासून आजारी 
अजित पवार मागील दोन दिवसांपासून आजारी आहेत, त्यामुळे त्यांनी कालचे पुण्यातील नियोजित कार्यक्रमही रद्द केले होते. तसेच रविवारी बुलढाण्याचा शासकीय कार्यक्रमालाही ते गेले नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

गटातील आमदारही नाराज?
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यामुळे अजित पवार गटातील मराठा समाजाचे आमदारही नाराज असल्याचे चर्चा आहे. यातील काही आमदारांनी आपली नाराजी अजित पवारांपर्यंत पोहोचविल्याचे सांगितले जात आहे.  

तीनही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे. कुठेही नाराजीचा सूर नाही. महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या सहकार्याने उत्तम सुरू आहे.
    - प्रफुल पटेल, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपविणार?

बुलढाण्यातील कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. अजित पवारांचा दौरा आलेला असतानाही ते या कार्यक्रमाला आले नाहीत. तर फडणवीस हे लडाखमध्ये असल्याचे सांगण्यात आले. मराठा समाजबांधव जाब विचारतील या धाकाने आणि त्यांचा आक्रोश पाहून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तेथे जाणे टाळले, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार? असा सवालही त्यांनी केला.

मंत्रालयातून आलेला तो अदृश्य फोन कुणाचा?

जालन्यात लाठीमाराचा आदेश मंत्रालयातून गेला होता. मंत्रालयातून गेलेला हा अदृश्य फोन कुणाचा होता? चाैकशी करायचीच असेल तर हा फोन कोणी केला याची चौकशी करायला हवी.
    - खा. संजय राऊत, शिवसेना (ठाकरे गट)

‘त्याचे’ उत्तर संजय राऊत यांनीच द्यायला हवे   

मंत्रालयातून जालन्यात लाठीमार करण्याबाबत फोन कोणी केला याचे उत्तर खा. संजय राऊत यांनीच द्यायला हवे. अशाप्रकारे खोटा आरोप करण्याची सवय राऊत यांनाच आहे. त्यांना गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज वाटत नाही.             - आ. संजय शिरसाट, 
    प्रवक्ता शिवसेना (शिंदे गट)

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar was absent from the 'Shasan Apya Dari' program held in Buldhana.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.