‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:14 IST2025-01-28T19:10:56+5:302025-01-28T19:14:10+5:30
Deputy CM Ajit Pawar News: अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे घेऊन अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?
Deputy CM Ajit Pawar News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून यासंदर्भात चर्चा करतो, असे आश्वासन अजित पवारांनी अंजली दमानिया यांना दिले होते. यावर आता अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे माझ्याकडे दिली. मी ती घेतली आणि पाहिली. रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. पण त्यांना नागपूरला जायचं असल्याने मी त्यांना आत्ताच भेटलो. त्यांनी मला सांगितले की, तुम्हाला अंजली दमानिया भेटल्या, तशा त्या मलाही भेटल्या. मलाही त्यांनी काही कागदपत्रे दिली आहेत. या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन. ही कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत. जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे
मी असेन किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतील, आम्ही आधीपासूनच सांगितले आहे की, जी घटना सरपंचांच्याबाबत बीड जिल्ह्यात घडली. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी सुरू आहे. कुणाची आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची हीच भूमिका आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. माझी गोष्ट वेगळी होती. माझ्यावेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झाले, म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठिशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुरेश धस यांना काय वाटते त्याच्याशी माझे काही घेणे देणे नाही. मी या सरकारमध्ये भाजपाच्या बरोबर आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचे सरकार व्यवस्थित पुढे काम करावे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काय अंतच राहणार नाही. त्यासंदर्भात जी काही भूमिका असेल ती अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील. हे बरोबर आहे ना, असे अजित पवार म्हणाले.