“राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:21 PM2021-12-29T12:21:14+5:302021-12-29T12:22:37+5:30
मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू, बाहेरच्यांनी नाक खुपसायची काही गरज नाही, असा पलटवार अजित पवार यांनी केला.
मुंबई: राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session Maharashtra) अनेकविध मुद्यांवरून चांगलेच गाजले. सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत राज्यात पुन्हा एकदा निर्बंधांचे संकेत दिले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावर अजित पवार यांनी काही संकेत दिले. अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लोकांनी काळजी न घेतल्यास पुढच्या दीड-दोन महिन्यांत संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या-त्या वेळी रुग्णसंख्येचा आकडा पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
आम्ही ठरवू बाहेरच्यांनी नाक खुपसायची काही गरज नाही
मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विरोधकांनी खोचक टीका करताना अनेक सल्ले दिले होते. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पदभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असे म्हटले होते. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावे असे म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाच्या चार्जवरून झालेल्या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्यानी त्यात नाक खुपसायची काही गरज नाही, असा पलटवार अजित पवारांनी केली.
दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारीपासून नागपुरात होणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र, पुढचे अधिवेशन नागपुरात घेण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती.