चारकोपमध्ये विकासाचा फॅक्टर मतदारांचा कौल ठरविणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:40 AM2019-03-15T01:40:44+5:302019-03-15T01:41:21+5:30
अंतर्गत राजकारणात निकाल कुणाचा लागणार; प्राबल्य असले तरी ते टिकविण्यासाठीची धडपड पणाला लागणार
- सचिन लुंगसे
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघापैकी चारकोप हा एक विधानसभा मतदारसंघ. भाजपाचे खासदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांच्या लोकसभा मतदार संघातील चारकोप विधानसभा मतदार संघात भाजपाचे प्राबल्य पाहण्यास मिळते. आजघडीला भाजपाचे योगेश सागर येथे आमदार आहेत.
२०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपातून सागर येथून विजयी झाले. २००९ सालची विधानसभा निवडणूक पाहिली तरी तेव्हाही भाजपातून सागरच विजयी झाले. गेल्या दहा वर्षांपासून या विधानसभा मतदार संघावर भाजपाचे वर्चस्व असून, लोकसभा निवडणूकीतकाँग्रेसला येथून अधिकाधिका मते प्राप्त करावयाची आहेत. आणि त्यासाठी त्यांना भाजपाचे वर्चस्व मोडीत काढावे लागेल.
मुंबई शहर आणि उपनगराकडे भौगोलिक दृष्टीकोनातून पाहिले जाते; तेव्हा उपनगरात पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर अशी दोन पद्धतीने भौगोलिक आखणी केली जाते. मानसिकता किंवा आणखी उर्वरित घटकांमुळे पश्चिम उपनगर हे एका अर्थाने ‘सधन’ मानले जाते. पश्चिम उपनगरातल्या चारकोप विधानसभेत आजघडीला मालवणी व्हिलेज, मालवणी, हिंदुस्थान नाका, सहयाद्री नगर, महावीर नगर, डहाणूकर वाडी, सेंच्युरी हॉस्पिटल, देवजी कॉलनी आणि पारस नगर अशा काहीशा परिसरांचा समावेश आहे. पश्चिम उपनगर हे ‘सधन’ मानले तरी येथील मतदार व संघांची एकमेकांशी तुलना केल्यास प्रश्न बदलत नाहीत. कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, खाडी किनारी असलेल्या पाणथळींची कत्तल, सातत्याने चारकोपमधील तिवरांकडे होणारे दुर्लक्ष, वाढती अनधिकृत बांधकामे, पायाभूत सेवा सुविधांचा विकास करताना निर्माण होणारे पर्यावरणाचे प्रश्न, वाढती गुन्हेगारी; असे अनेक प्रश्न लोकप्रतिनिधींसमोर तोंड आ वासून उभे आहेत. जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे; तेवढीच जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे.
खासदार, आमदार, नगरसेवक एका अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्नांची जाण असणे आणि ते प्रश्न सोडविणे हे प्राथमिक जबाबदारी लोकप्रतिनिधींची असल्याने; आणि साहजिकच दहा वर्षांच्या येथील सत्तेमुळे भाजपाला ते चांगले जमले. या विधानसभा मतदार संघातील कामे झाली आहेत; हेच नमूद करताना मतदार नव्या समस्यांचाही पाढा वाचतात. मुळात चारकोप परिसरातील तिवरांची कत्तल करून अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य वाढविणे ही येथील परिसराला लागलेली किड असून, पर्यावरणीय प्रश्नाकडे कसे पाहिले जाते हे तेवढेच महत्त्वाचे आहे़ प्रथमदर्शनी तरी प्रश्न मांडताना काँग्रेसला भाजपाला मोठी टक्कर द्यावी लागेल.
राजकीय घडामोडी
भाजपाने दहा वर्षात बस्तान बसविले असले तरीदेखील काँग्रेस काय खेळी खेळते? याकडे सर्वांचेच लक्ष असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
स्थानिक उमेदवार शोधण्याबरोबरच एखादा नावलौकिक प्राप्त उमेदवार शोधणे हे काँग्रेससमोरचे आव्हान असल्याने राजकीय खेळीही प्रतीक्षेत आहे.
अंतर्गत राजकारणाबाबत काँग्रेस, भाजपा माहीर असले तरी देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीची येथील छुपी भूमिका राजकारणास वळण देईल.
बहुतांशी मतदार हा उत्तर भारतीय आहे. मराठीचे प्राबल्य असले तरी फेरीवाल्यांच्या प्रश्नाहून राजकीय कल कुठे जातो? हे मोठी घडामोड असेल.
दृष्टिक्षेपात राजकारण
२००९ सालच्या विधानसभा निवडणूकीदरम्यान भाजपाने काँग्रेससह इतर पक्षांना धूळ चारली होती. प्रमुख लढत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी असली तरी देखील मनसे आणि इतर पक्षांनी ओढलेली मते हे या दोन्ही पक्षांची डोकेदुखी ठरली होती. साहजिकच भाजपाचा विजय झाला असला तरी मनसेसारखे पक्ष निवडणूकीत एक मोठा फॅक्टर ठरत असतात; आणि तेव्हा हे दिसून आले होते.
२०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीत युती तुटली आणि साहजिकच प्रत्येक पक्षाने आपली वेगळी चूल मांडली. परिणामी शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष आणखी वाढला. ‘मोदी’ लाटेत भाजपाला विजय प्राप्त झाला असला तरी गत विधानसभेला दुसरा क्रमांक पटकाविणारा काँग्रेस यावेळी तिसरा होता. आणि शिवसेना दुसरी होती. तर मनसे चौथ्या स्थानी होती.
‘मोदी’ लाट राहील की नाही हा प्रश्न तुर्तास बाजुला असला तरी यावेळी युती टिकली आहे. मतदारांना खेचण्यास काँग्रेस कितपत यशस्वी होईल; हे येणारा काळच ठरवेल.