उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक; काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 02:46 PM2020-02-23T14:46:49+5:302020-02-23T14:52:14+5:30
Devendra Fadnavis: थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे.
मुंबई - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे आणि सीएए या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परखड भूमिका घेतली. या दोन बाबींसाठी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायचे आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे. तसेच जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 'शिदोरी' मासिकावर कारवाई करावीच लागेल. इंदिराजींबाबत 10 मिनिटात माफी मागणारे सावरकरांबाबत मौन का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल विचारला आहे.
मुस्लीम मतांसाठी देशात स्पर्धा
राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तर मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही त्यांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. तर सद्या मुस्लीम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे.
थेट सरपंच निवड रद्द केल्यावर आक्षेप
थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. सरपंच निवडणूक थेट घेण्याचा निर्णय आम्ही सुद्धा सरपंच परिषदेच्या शिफारसीवर घेतला होता असं सांगत थेट सरपंच निवड रद्द करण्याचा निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे.
कर्जमाफीवरुन सरकारला पकडणार कोडींत
कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू, कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही, जाहीर नाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, आतापर्यंत नव्या सरकारला सूर गवसलेला नाही. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत येणाऱ्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी विषयावरुन राज्य सरकारला कोडींत पकडण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे.