Devendra Fadnavis Resign : देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; बहुमत नसल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:47 PM2019-11-26T15:47:50+5:302019-11-26T16:02:09+5:30
Devendra Fadnavis Resign | देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.
Devendra Fadnavis resigns as the Chief Minister of #Maharashtra. pic.twitter.com/45ysg3CMx3
— ANI (@ANI) November 26, 2019
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, " सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी भेटून सांगितले की काही कारणाने आम्ही आघाडीत राहू शकत नाही, त्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलेले नाही, आम्ही कुणाचेही आमदार फोडणार नाही."
याचबरोबर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. मातोश्रीवरुन बाहेर न पडणाऱ्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, शिवसेनेला नंबर गेम लक्षात आला आणि बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे समजल्याने जे कधीच ठरले नव्हते, त्याबाबत शिवसेनेने दिली, तरीही भाजपाने सात्विक भूमिका घेतली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करु लागली, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला.
Devendra Fadnavis: The hunger for power is such that now Shiv Sena leaders are even willing to ally with Sonia Gandhi. #Maharashtrapic.twitter.com/8k4IKb9JHU
— ANI (@ANI) November 26, 2019
जनादेशाचा सन्मान करण्यासाठी जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही 70 टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना केवळ 40 टक्के जागांवर विजयी झाली. शिवसेनेने बहुमत असल्याचे भासवून हसू करुन घेतले, त्यानंतर राष्ट्रवादीही बहुमत सिद्ध करण्यात अपयशी, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही तीन पक्ष मिळून सरकार तयार करणार असे सांगितले जात होते पण असे होत नव्हते. तीन पक्षांची विविध विचारधारा होती. भाजपाला दूर ठेवा एवढाच किमान समान कार्यक्रम होता. राज्यात किती वेळ राष्ट्रपती राजवट राहिल अशी परिस्थिती असताना अजित पवार यांनी सत्तास्थापनेसाठी सहकार्य करण्याचे ठरविले. अजित पवारांशी चर्चा करुन राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंबा पत्राआधारे आम्ही बहुमताचा दावा केला. शपथविधी झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवारांनी राजीनामा दिल्याने कुठलाही घोडेबाजार न करता आम्हीही राजीनामा देणार आहे. जे सत्तास्थापन करणार आहेत त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगले सरकार द्यावं, पण हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल अशी भीती वाटते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर केली.