गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू: फडणवीस
By मोरेश्वर येरम | Published: November 18, 2020 05:57 PM2020-11-18T17:57:42+5:302020-11-18T18:32:09+5:30
काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुपकर आघाडीमध्ये काँग्रेसचा देखील समावेश असल्याचा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई
जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन झालेल्या गुपकर आघाडीच्या मुद्द्यावरुन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुपकर आघाडीमध्ये काँग्रेसचा देखील समावेश असल्याचा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे.
राष्ट्रविरोधी शक्तींनी कितीही प्रयत्न केले तरी या देशात ३७० कलम पुन्हा कधीच लागू होणार नाही, असं ठाम मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेण्याची तयारी या गुपकर आघाडीने सुरू केली असल्याचंही ते म्हणाले. देशाचं विघटन करू पाहणाऱ्या या गुपकर आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका काय? असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यासोबत काँग्रेस या आघाडीत सामील झाली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. गुपकर आघाडीचा अजेंडा काँग्रेसला मान्य आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. देशाचं विघटन करणाऱ्या शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असंही फडणवीस म्हणाले.
'मेहबुबा मुफ्ती यांनी देशाचा राष्ट्रध्वज जम्मू-काश्मीरमध्ये फडकू देणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. अशा लोकांच्या आघाडीत काँग्रेसचही सहभागी होत असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू आणि देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू', असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.