Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:47 PM2023-08-03T15:47:35+5:302023-08-03T15:58:02+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसच्याविजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत घोषणा केली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी, अभिनंदनपर भाषणात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले, त्यामुळे विरोधात काँग्रेस आमदारांची संख्या अधिक असल्याने या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता. नुकतेच, विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वड्डेटीवार यांचे अभिनंदन करत त्यांना चिमटेही काढले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे अभिनंदन करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. त्यांचे, मी अभिनंदन करतो. तसेच, येथील विरोधी पक्षनेतेपदाला मोठा इतिहास आणि अनेक दिग्गजांचा वारसा असून या पदाचा मान-सन्मान वाढविण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक आणि संवेदनशील दोन्ही असावं लागतं. मी आपणास एकच आश्वस्त करतो की, या नव्या विरोधी पक्षनेत्यांना सभागृहाचे मुद्देसूद उत्तर मिळेल. राज्य सरकारच्यावतीने मी असेल, मुख्यमंत्री असतील किंवा दादा असतील आम्ही योग्य उत्तर देऊ. जी चर्चा असेल त्याला सकारात्मक उत्तर देऊ. हे मी यासाठी सांगतो की, मी अडीच वर्ष विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा माझ्यावेळी मात्र 'शिवाजी पार्क'टाईप उत्तर मिळायचे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. त्यांचे अभिनंदन करताना विधानसभेत व्यक्त केलेले मनोगत....
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2023
एकच आश्र्वस्त करतो या नव्या विरोधी पक्षनेत्यांना सभागृहाचे मुद्देसूद उत्तर मिळेल. माझ्यावेळी मात्र 'शिवाजी पार्क'टाईप… pic.twitter.com/NR1WWTiQEC
मुख्यमंत्री शिंदेंनीही काढला चिमटा
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विजय वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. वडेट्टीवार विदर्भातील नेते आणि आमचे उपमुख्यमंत्रीदेखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याला वेगळा गुण असतो. त्यामुळे राज्याच्या इतिहासात ४ विदर्भाचे मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाला देशातील राष्ट्रपती मिळाले. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हातभार कुणी धरू शकत नाही असं कौतुक शिंदेंनी केले.