"मराठा समाजासाठी मी काय केलंय, ते त्यांनाही माहिती आहे"; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 08:02 PM2024-02-25T20:02:26+5:302024-02-25T20:03:32+5:30
'आतापर्यंत जी स्क्रीप्ट उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत होते, नेमकी तशीच स्क्रीप्ट मनोज जरांगे यांनी मांडली.'
Maratha Reservation: सोमवार(दि.26) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिले आणि विरोधकांवरही खोचक टीका केली.
'मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षणाचा कायदा सरकारने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता, तो शब्द पूर्ण केला आहे.' मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार आहेत, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'सागर बंगला सरकारी आहे, कोणीही कामासाठी सागर बंगल्यावर येऊ शकतो, कोणालाही अडवले जाणार नाही.'
'मनोज जरांगे कुठल्या निराशेतून बोलत आहेत, कुठली सहानुभुती त्यांना घ्यायची आहे, ते मला माहित नाही. त्यांनाही माहिती आहे की, ते आज जे बोलले, ते सर्व खोटं आहे. मराठा समाजासाठी मी काय केलंय, मराठा समाजालाही माहित आहे. आजची सारथी संस्था आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाची सुरुवात मी केली होती.'
'मी मुख्यमंत्री असताना मराठी आरक्षण दिले, पण त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. एक गोष्ट निश्चित, जी स्क्रीप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत होते, नेमकी तशीच स्क्रीप्ट मनोज जरांगे यांनी मांडली. तुर्तास एवढच बोलने की, कायदा सुव्यवस्था न बिघडवता आंदोलन केले तर आमची हरकत नाही, पण कायदा मोडाल, तर योग्य कारवाई होईलच,' असा स्पष्ट इशारा फडणवीसांनी दिला.