महाराष्ट्र विकणं चहा विकण्यासारखं वाटलं का?, राष्ट्रवादीचं पडळकरांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 08:35 AM2021-12-23T08:35:15+5:302021-12-23T08:37:11+5:30
महाराष्ट्र विकणं म्हणजे चहा विकण्यासारखं आहे का? असा सवाल आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
मुंबई - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केली. यामुळे आता वाद वाढण्याची शक्यता आहे. पडळकर यांच्या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. महाराष्ट्र विकणं म्हणजे चहा विकण्याप्रमाणं आहे का, असा सवालच आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
महाराष्ट्र विकणं म्हणजे चहा विकण्यासारखं आहे का? असा सवाल आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. तसेच, ज्या व्यक्तीचा महाराष्ट्राच्या जनतेशी तीळमात्र संबंध नाही, ती व्यक्ती अजित पवार यांच्याबद्दल बोलते, याचा काय संबंध. लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान असताना देशात अन्नत्याग आंदोलनाचं आवाहन केलं होतं. त्यावेळी, देशातील संपूर्ण जनतेनं त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन शेती कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांनी संसदेत हे कायदे मागे घ्या, तेव्हाच आंदोलन संपण्याची भाषा केली. त्यामुळे, जनतेचा मोदींवर विश्वास नसून भाजप ही त्यांचीच बेताल पार्टी आहे.
उठसूट चर्चेत राहण्याकरिती अकलेचं दिवाळं काढणारे हे लोकं असे विधान करतात. अजित पवार यांची काम करण्याच पद्धत पाहा, याउलट भाजपाच्या हातात महाराष्ट्र असता तर महाराष्ट्र भिकेला काढला असता, असे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
सीबीआय चौकशीची मागणी
अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, अशी टीका पडळकर यांनी केली. तसेच, राज्यातील परीक्षांच्या घोळावरुनही सरकारवर निशाणा साधला. राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय. या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक यात सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार ? सीबीआय चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणीही त्यांनी केली.