महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा; नाना पटोलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:10 PM2024-02-09T17:10:47+5:302024-02-09T17:12:19+5:30
काल मुंबईतील दहीसर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली.
Nana Patole ( Marathi News ) : मुंबई- काल मुंबईतील दहीसर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. मॉरिस नोरोन्हा या व्यक्तीने हा गोळीबार केली आणि स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी उल्हासनगर येथील आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळबार केला होता. यानंतर आता काल ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. तर दुसरीकडे पुण्यातील काही गुंडांचे सरकारमधील संबंध असल्याचा आरोप सुरू आहे. यावर आता राज्याक राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे.
अभिषेक घोसाळकरांवरच पिस्तुलीतील गोळ्या संपवल्या, मॉरिसने स्वत:वर कुठून झाडल्या?
"महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभीर्य नाही
"राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील” असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का?, असा सवालही पटोले यांनी केला. 'महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही. भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे हे NCRB च्या अहवालात म्हटले आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो त्यानंतर ठाणे, मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो. नागपुरच्या अधिवेशनात मी ही आकडेवारीसह मांडली होती, असंही नाना पटोले म्हणाले.
राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहे. तडीपार गुंडांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. काही भ्रष्ट व कलंकित IPS अधिकाऱ्यांना नियम डावलून प्रमोशन दिले आहे तर प्रामाणिक व इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात आहे. पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप व दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत. गुंडांनी शासन व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, भाजपाने महाराष्ट्रात गुंडाराज आणले आहे. सत्ताधारी सर्रास धमक्या देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.