विधान परिषदेवरून काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:32 AM2020-06-12T06:32:12+5:302020-06-12T06:32:55+5:30
काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार
अतुल कुलकर्णी ।
मुंबई : विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, या पक्षांत समसमान वाटप झाले पाहिजे. शिवाय, विविध महामंडळांच्या नेमणुकादेखील समान झाल्या पाहिजेत, यावरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक मुंबईत गुरुवारी झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्य नेतेही या बैठकीला हजर होते. मंत्रीपदाचे वाटप आमदारांच्या संख्येनुसार झाले असले तरी भविष्यातील सर्व वाटप समसमान असेल, असे याआधी अनेकदा ठरले होते. विधान परिषदेच्या जागा तिन्ही पक्षांनी समान वाटून घ्यायच्या, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता, असे असताना आता ५ जागा शिवसेनेला, ४ जागा राष्ट्रवादीला आणि ३ जागा काँग्रेसला, असा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जे ठरले होते त्याचे पालन झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगण्यात येईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
याबाबत बोलताना बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आम्ही सहयोगी पक्ष आहोत, निर्णय प्रक्रियेत सहभागी नसतो, असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असे काही नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसला निर्णय प्रक्रियेतही सहभागी करून घेतले पाहिजे, ही आमची मागणी कायम आहे. जे निर्णय महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याआधी घेतले आहेत, त्यावर सगळ्यांनी कायम राहावे. नवे मुद्दे काढून वाद निर्माण होतील, असे होऊ देऊ नये, अशी आपली भावना असल्याचे चव्हाण म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्यामध्ये काही चर्चेचे मुद्दे आहेत. काही विषयांवरून आमच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांना ती बोलून दाखवू, त्यासाठी लवकरच त्यांची भेट घेतली जाईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. विविध विकासकामांच्या निधीचे वाटप करताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना झुकते माप दिले गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी काही मध्यस्थी केली पाहिजे; पण ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकत आहेत, अशी भावना काँग्रेस मंत्र्यांमध्ये येत आहे.