जिल्हा योजना निकष मुनगंटीवारांनी बदलले; अजित पवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:29 AM2020-03-14T02:29:11+5:302020-03-14T02:29:48+5:30
मागील कर्जमाफी तीन वर्षे सुरू होत
मुंबई : जिल्हा वार्षिक योजनेत आम्ही दुजाभाव केलेला नाही. निकषांनुसारच निधी दिलेला आहे. मात्र, आधीच्या सरकारमध्ये तेव्हाचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे निकष बदलून निधी दिला होता, अशी टीका उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ, मानवविकास निर्देशांक आणि क्षेत्रफळ या निकषावर हा निधी दिला जातो. मात्र मुनगंटीवार यांनी त्यावेळी हे निकष बाजूला सारून त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्याला २०१९-२० मध्ये तब्बल १६० कोटी रुपये जादा दिले. वर्धा जिल्ह्याला देखील जादा निधी दिला आणि अन्य मुंबईला १२४ कोटी, ठाण्याला ६३ कोटी, पालघरला २० कोटी रुपये कमी दिले, असे पवार म्हणाले. आम्ही नियम आणि निकषानुसारच निधी दिला असून एकाला निधी देताना दुसऱ्या जिल्ह्याचा तोंडचा घास काढलेला नाही, असा दावा पवार यांनी केला.
तुमच्या सरकारने दिलेली कर्जमाफी तीन वर्षे सुरू होती. अशी तीन-तीन वर्षे कर्जमाफी चालत असते का? आम्ही पंधरा दिवसांतच १७ लाख ८० हजार शेतकऱ्यांना ११३४० कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. १५ एप्रिलपर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल, असे अजित पवार म्हणाले. पूर्वीच्या कर्जमाफीच्या निमित्ताने लोकांची पिवळी व्हायची वेळ आली, असा चिमटाही त्यांनी काढला.