'अफवांवर विश्वास ठेऊ नका, 'स्वराज रक्षक संभाजी' मालिका पूर्ण करणारच'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:22 PM2019-03-11T22:22:40+5:302019-03-11T22:23:50+5:30
अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, अनेकांनी त्यांचे समर्थन केले
मुंबई - राजा शिवछत्रपती मालिकेत राजे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी मालिकेत संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी 'स्वराज रक्षक संभाजी' मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचार करत नसल्याचं कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी याबाबत माहिती दिली.
अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, अनेकांनी त्यांचे समर्थन केले, तर अनेकांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत, आता 'स्वराज रक्षक संभाजी' मालिका अमोल कोल्हे सोडणार, ते केवळ राजकीय पक्षाचं काम करणार अशा बातम्या सोशल मीडियावरुन फिरत होत्या. तसेच, सोशल मीडियावरुन त्यांच्या मालिकेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, खुद्द अमोल कोल्हे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'आता News Channel वरून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरत आहेत, त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या बातमीवर विश्वास ठेवू नका हि नम्र विनंती. मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील!धन्यवाद!' असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मालिका पूर्ण केल्यानंतरच राजकीय क्षेत्रासाठी मालिका क्षेत्राला रामराम करणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हेंना पाहू इच्छित असलेल्या त्यांच्या चाहत्यांना हा सुखद धक्का आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे समजते. त्यानंतर, त्यांची जन्मभूमी असलेल्या नारायणगाव येथे स्वागत मेळाव्याचे आयोजन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना, केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन 2014 मध्ये विजयी झालात. ज्या रयतेने कल्याणकारी राज्य म्हणून निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडवर नव्हे तर कुठल्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा आणून त्या पैशातून दहशतवाद्यांविरोधत कारवाई करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली होती.