आम्हालाही भावना आहेत की नाही? अस्वस्थ अजित पवारांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:53 AM2019-09-29T06:53:10+5:302019-09-29T06:54:09+5:30

घोटाळ्यांच्या भडिमाराने आणि राज्य बँक कथित घोटाळ्यात काका शरद पवार यांना गोवल्याने भावुक झालेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शनिवारी पत्रपरिषदेत भावुक झाले.

Do we have feelings or not? Ajit Pawar tears away in press conference | आम्हालाही भावना आहेत की नाही? अस्वस्थ अजित पवारांना अश्रू अनावर

आम्हालाही भावना आहेत की नाही? अस्वस्थ अजित पवारांना अश्रू अनावर

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी
मुंबई : घोटाळ्यांच्या भडिमाराने आणि राज्य बँक कथित घोटाळ्यात काका शरद पवार यांना गोवल्याने भावुक झालेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शनिवारी पत्रपरिषदेत भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यांच्या आरोपातून काही निघाले नाही. आता राज्य बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप होतोय. आम्हाला भावना आहेत की नाही? राजकारणात असलो तरी आम्हीही माणसं आहोत, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

राज्य बँक घोटाळ्यात आपल्यामुळे शरद पवार यांचे नाव येत असल्याने अस्वस्थ होऊन आपण आमदारकीचा राजीनामा दिला. तो देताना पवार साहेब, राष्ट्रवादीचे नेते यांना कल्पना दिली नाही ही आपली चूक होती. त्यासाठी मी माफी मागतो, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड हे नेते या वेळी हजर होते.

राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळात आपले नाव नसते तर ही केस उभी राहिली नसती. मी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत ज्यांच्यामुळे पोहोचलो त्या शरद पवार यांचा संबंध नसताना माझ्यामुळेच त्यांचे नाव गोवण्यात आले. माझ्यामुळे त्यांची बदनामी व्हायला लागली. यामुळे उद्विग्न होऊन आपण राजीनामा दिल्याचे पवार म्हणाले. साडेअकरा-बारा हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेत एवढा घोटाळा होईलच कसा? सहकारातील लोकांना हे कळते, पण ११ कोटी जनतेला काय सांगणार, असे सांगताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला.

राज्य सरकारने विधिमंडळात या बँकेत १0८८ कोटींची अनियमितता असल्याचे उत्तर दिले होते. त्यात कुठेही भ्रष्टाचार असा शब्द नाही. हे सर्व कर्ज संबंधितांनी फेडले आहे. या बँकेला या वर्षी २८५ कोटींचा नफा झाला आहे.

भ्रष्टाचार असता तर नफा झाला असता का, असा सवालही त्यांनी केला. भाजप नेत्यांच्या (पंकजा मुंडे, धनंजय महाडिक आदी) चार साखर कारखान्यांना ते एनपीएत असतानाही मर्यादेच्या बाहेर जाऊन सरकारने मदत केलीच ना, असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते नॉट रिचेबल होते. शनिवारी दुपारी ते शरद पवार यांना भेटले. तेथे पवार, खा. सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांच्याशी त्यांची दोन तास चर्चा झाली. त्यानंतर बाहेर येऊन शरद पवार यांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगितले. आता अजितच तुमच्याशी बोलेल, असे ते म्हणाले. पक्षांतर्गत अवहेलना व कौटुंबिक वादातून अजित पवार यांनी सर्वांना अंधारात ठेवून राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्या बाबींवर पडदा टाकत अजित पवार यांनी पक्ष आणि राजकारण सोडणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गृहकलह असल्याचा इन्कार
कुटुंबात गृहकलह असल्याचा इन्कार करताना ते म्हणाले की, सुप्रिया सुळे राजकारणात आल्या तेव्हाही असंच बोललं गेलं. पार्थच्या वेळीही तेच झालं. आता रोहित पवारांना पक्ष उमेदवारी देतोय तर तेच बोललं जात आहे. आमच्यात भांडण कशाला लावता? आजही पवार साहेबांचाच शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. आताही पवार साहेबांनी सांगितले आहे की, ते जो निर्णय घेतील त्यानुसारच मला काम करावे लागणार आहे. माझी तेव्हा तर त्यांच्या डोळ्यात बघण्याचीही हिंमत झाली नाही.

आम्ही इतकी वर्षे दिवसरात्र मरमर मरतो. सकाळपासून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करतो. पण काहीच संबंध नसताना आरोप होतात म्हणून मी पार्थला म्हटले की शेती-उद्योग बघ.

Web Title: Do we have feelings or not? Ajit Pawar tears away in press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.