कुर्ला डेअरीची जागा अदानीला देऊ नका - वर्षा गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 07:11 AM2024-06-30T07:11:32+5:302024-06-30T07:12:58+5:30
कुर्ला डेअरीची जमीन बांधकामासाठी वळवणारा जीआर त्वरित मागे घ्यावा आणि ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणून राखीव ठेवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या व मोक्याच्या जागा पंतप्रधानांचे उद्योगपती मित्र अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली एक लाख कुटुंबांना बेघर करण्याचा डाव असून त्या विरोधात संघर्ष सुरू आहे. आरेतील वृक्ष तोड असो वा कुर्ल्यातील डेअरची जागा, पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या जमिनी लुटण्याचे काम सुरू असून त्या विरोधात लढा सुरू आहे. कुर्ला डेअरीची जमीन बांधकामासाठी वळवणारा जीआर त्वरित मागे घ्यावा आणि ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणून राखीव ठेवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कुर्ला डेअरीची जागा बळकावण्याच्या विरोधात नेहरू नगरमधील रहिवाशांनी एकत्र येऊन मोहीम सुरू केली आहे. यात वर्षा गायकवाड यांच्यासोबत शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
जीआर रद्द करण्याची गायकवाड यांची मागणी
आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण विकासाच्या नावाखाली महत्वाच्या जागा जर धनदांडग्यांच्या घशात घालून स्थानिकांना विस्थापित करणार असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही. मुंबईत सर्वात मोठी समस्या मोकळ्या जागांची आहे, मुलांना खेळायला जागा नाही असे असताना ही निसर्गसंपन्न जागा कशासाठी द्यायची. आरे कॉलनीतील वेताळ टेकडीचाही मुद्दा आहे. आरेची लढाई अजून सुरूच आहे. झाडे तोडून निसर्ग संपवले जात आहेत. मदर डेअरीची जमीन असो, मुलुंडची असो वा देवनार, कोरबाची वा मीठागरांच्या जमिनी, या जमिनी सरकारच्या आहेत, स्थानिक लोकांच्या आहेत त्या त्यांनाच मिळाल्या पाहिजेत, असे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.