गेले त्याची चिंता नको, नवे नेतृत्व तयार करू; शरद पवार यांनी घातली भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 06:08 AM2023-07-06T06:08:56+5:302023-07-06T06:09:08+5:30
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी बैठक बोलावली होती.
मुंबई : कुणी गेले त्याची चिंता करू नका, गेले त्यांना तिथे सुखाने राहू द्या. त्याबद्दल आपली काहीच तक्रार नाही. आपण सामूहिक शक्तीतून नवीन कर्तृत्ववान नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करू, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी घातली.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला लोकसभेतील खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि अमोल कोल्हे तसेच लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार अहमद फैजल उपस्थित होते. राज्यसभेच्या खासदारांमध्ये स्वत: शरद पवार, फौजिया खान आणि वंदना चव्हाण उपस्थित होत्या.
पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिष्ठानचे मुख्य सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. तळमजल्यावर, बाहेरील मोकळ्या जागेत आणि चौथ्या मजल्यावर स्क्रीन लावून कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले गेले.
इतर राज्यात घडले त्यापेक्षा वेगळे इथे घडणार नाही
किती आमदार कुठे, याची चर्चा आहे. मी त्या खोलात गेलो नाही. आमदार येतात, आमदारांना निवडून आणता येते. १९८० साली आमचे ६८ आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षाचा नेता होताे. मी आठ दिवसांसाठी इंग्लंडला गेलो. परत आलो तर ६८ मधील ६२ आमदार गेले होते. माझ्यासह ६ नेते राहिलो. मी म्हटले काही काळजी करू नका. चार वर्षांत राज्याच्या कोनाकोपऱ्यात दौरे केले, जे ६२ गेले त्यातील ४ सोडून सगळे पडले.
पुन्हा सगळे नवे चेहरे, तरुण लोक निवडून आले. आज सांगतात तुम्ही शिवसेनेबरोबर गेला मग आम्ही भाजपबरोबर गेलो तर त्यात चूक काय? पण यात फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहे, भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसात विद्वेष वाढवणारे हिंदुत्व भाजपचे आहे. देशाच्या इतर राज्यात घडले त्यापेक्षा वेगळे इथे घडणार नाही.
- खा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी