‘त्या’ आमदारांसाठी काँग्रेसची दारे बंदच; पक्षश्रेष्ठींना यादी पाठवली : नाना पटोले

By यदू जोशी | Published: July 14, 2024 06:24 AM2024-07-14T06:24:30+5:302024-07-14T06:24:52+5:30

ज्यांनी कालच्या निवडणुकीत पक्षाची साथ सोडली त्यांना किंमत मोजावी लागेल - नाना पटोले

Doors of Congress remain closed to seven MLAs who cross voted in the Legislative Council elections Says Nana Patole | ‘त्या’ आमदारांसाठी काँग्रेसची दारे बंदच; पक्षश्रेष्ठींना यादी पाठवली : नाना पटोले

‘त्या’ आमदारांसाठी काँग्रेसची दारे बंदच; पक्षश्रेष्ठींना यादी पाठवली : नाना पटोले

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठविला आहे. या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद असतील, लवकर त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी ‘लोकमत’ ला सांगितले. 

ज्यांनी कालच्या निवडणुकीत पक्षाची साथ सोडली त्यांना किंमत मोजावी लागेल. चंद्रकांत हंडोरे जून २०२२ मधील राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हाही काही जणांनी पक्षाशी गद्दारी केलेली होती. त्यावेळी चौकशी समितीही नेमलेली होती, त्यावेळी पक्षाला दगा देणारे आमदार याहीवेळी तसेच वागले. आणखी काही नावे त्यात जोडली गेली, असे पटोले म्हणाले. 

पक्षाशी निष्ठा न ठेवणाऱ्या लोकांचा कचरा या निमित्ताने गेला, असे मला वाटते. हे लोक कधीही पक्षाला धोका देऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत यांच्यापैकी एकालाही तिकीट दिले तर तो इंदूर पॅटर्न करून महायुतीसोबत जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापैकी एकालाही विधानसभेचे तिकीट देऊ नये, अशी भूमिका मी पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या अहवालात केली आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली. 

जयंत पाटील यांनी मते मागितली नाहीत

शेकापचे जयंत पाटील यांना काँग्रेसने आपल्याकडील अतिरिक्त पहिल्या पसंतीची काही मते दिली असती तर त्यांचा विजय झाला असता असे आता म्हटले जात आहे, याबाबत विचारले असता पटोले म्हणाले की, जयंत पाटील यांनी आमच्याकडे मते मागितलेली नव्हती. माझ्याकडे पुरेशी मते आहेत, असे ते उघडपणे सांगत होते. 

उद्धव ठाकरे यांना काही मतांची गरज असल्याने त्यांनी तशी काँग्रेसकडे  विनंती केली त्यानुसार आमच्याकडील पहिल्या पसंतीची जादाची मते आम्ही मिलिंद नार्वेकर यांना दिली. ठाकरेंनी आम्हाला विचारून उमेदवार दिलेला नव्हता, तरीही आम्ही आघाडीधर्म निभावला.

नऊ जागा जिंकल्या म्हणून महायुती खूप आनंद साजरा करत आहे पण फोडाफोडी करून, वेगवेगळी आमिषे दाखवून अशी निवडणूक जिंकता येते पण विधानसभेचे घोडामैदान जवळ आहे. विधानसेभच्या निवडणुकीत   महायुतीची खरी कसोटी पहायला मिळेल. 

२०१९ मधील पहाटेच्या शपथविधीपासून सुरू झालेले भाजपचे दगाबाजीचे राजकारण मतदारांना रुचलेले नाही. विधानसभेत मतदार भाजपला अजिबात स्वीकारणार नाहीत, असे मत  पटोले यांनी व्यक्त केले. 

Web Title: Doors of Congress remain closed to seven MLAs who cross voted in the Legislative Council elections Says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.