प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत एंट्री? अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 02:32 PM2022-12-06T14:32:48+5:302022-12-06T14:33:38+5:30
आता प्रकाश आंबडेकर महाविकास आघाडीत येणार का, याचीही चर्चा होत आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याचा कामाने आता गती पकडली आहे. आगामी निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग रंगणार की महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरविणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे, या चर्चेपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केली आहे. त्यामुळे, आता प्रकाश आंबडेकर महाविकास आघाडीत येणार का, याचीही चर्चा होत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या अटी- शर्तीवरच युती होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेत्यांसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही यासंदर्भात बोलणी केली आहे. समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे, आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यास अॅड. प्रकाश आंबेडकर हेही महाविकास आघाडीत सामिल होण्याची शक्यता दिसून येत आहे.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग होणार का?
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग होणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, त्यांची येण्याची मानसिकता आहे. त्यांचे काही विषय आहे, ते विषय जटील आहे, असे नाही. पण ते सगळे विषय संपवू. जसे आम्ही एकत्र आलो. मित्र पक्ष एकत्र आले. तसे येऊ. महाविकास आघाडी होताना एक-दोन नाही, तर अनेक बैठका झाल्या. यावेळी अनेक मुद्द्यांवर योग्य पद्धतीने चर्चा करण्यात आली. कोणते विषय भविष्यात अडचणीचे ठरू शकतात किंवा अडचणीत टाकणारे विषय आहेत का, यावर सखोल चर्चा करण्यात आली. नंतरच महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे आलो. महाविकास आघाडीत आम्ही केवळ सरकार स्थापण्यासाठी एकत्र आलेलो नाही. कटकारस्थान करून आमचे सरकार पाडले, तरीही एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून आम्ही एकत्र आहोत. प्रकाश आंबेडकर यांचीही तशीच मानसिकता आहे. पुढे जाऊन काही अडचणीचे मुद्दे येऊ नयेत, यासाठी चर्चा सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
युतीवर काय म्हणाले रामदास आठवले
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती असं म्हणत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येताय. मात्र ती भीमशक्ती नसून वंचितशक्ती आहे. कारण, भीमशक्ती माझ्यासोबत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं. शिवशक्ती आणि भीमशक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच प्रकाश आंबेडकर जरी उद्धव ठाकरेंसोबत गेले, तरी आमच्या राजकारणात याचा काहीही फरक पडणार नाही, असा दावाही केला.