देवही आम्हाला माफ करणार नाही; हिट अँड रन प्रकरणात उच्च न्यायालयाची उद्विग्नता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 08:57 AM2024-09-24T08:57:35+5:302024-09-24T08:57:50+5:30
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होेती
मुंबई : पोलिसांनी लिखित स्वरुपात आरोपीला कारण दिले नाही. या तांत्रिक मुद्द्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना सोडण्यात आले आहे, हे विचारात घेत उच्च न्यायालयाने, “अशा तांत्रिक कारणास्तव आम्ही आरोपींना सोडत गेलो तर देवही आम्हाला माफ करणार नाही”, अशा शब्दांत उद्विग्नता व्यक्त केली.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने पोलिसांनी आपल्याला अटक करण्याची लिखित कारणे दिली नसल्याने माझी अटक बेकायदा आहे, असा दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच्या याचिकेवर न्या. भारती डांग्रे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
‘’पोलिसांनी अटकेचे लिखित कारण दिले नाही म्हणून अनेक गुन्ह्यांतील आरोपींना सोडण्यात येत आहे. त्यामुळे तपासात अडथळा निर्माण होत आहे. गंभीर गुन्ह्यांतील सर्वच आरोपींची जामिनावर सुटका करणे शक्य नाही. या मुद्द्यावर समतोल साधणे आवश्यक आहे,’’ असे खंडपीठाने नमूद केले.
आरोपीला कोणत्या पद्धतीने आणि का अटक करण्यात आली, हे सांगण्यात आले आणि त्यावेळी पंच उपस्थित होते का? याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला देत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला ठेवली.
न्यायालय काय म्हणाले?
‘’समतोल साधण्याची गरज आहे. या प्रकरणाप्रमाणे कधी कधी गुन्हा गंभीर स्वरुपाचा असतो. गाडीने एका महिलेला फरफटत नेले आणि त्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपी कोणत्या प्रकारचा नागरिक आहे? स्वतःच्या मूलभूत अधिकारांविषयी युक्तिवाद करता, पण बळी पडलेल्या नागरिकांच्या अधिकारांचे काय?’’ असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
मिहीर शहाने केलेला गुन्हा गंभीर आहे. सबळ पुरावे आहेत. पोलिसांनी त्याला अटकेची कारणे सांगितली होती, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने म्हटले की, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. तांत्रिक कारणे विचारात घेऊन आरोपींना सोडले तर देवही आम्हाला माफ करणार नाही.