"लवादाचा निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही"; महापत्रकार परिषदेतून हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:11 PM2024-01-16T17:11:33+5:302024-01-16T17:15:26+5:30
खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीका केली होती
मुंबई - आमदार अपात्रता प्रकरण निकालावर शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याचे उघड आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडूनही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे. यातच या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुली पत्रकार परिषद घेतली असून यात कायदेतज्ज्ञांसह अन्य मान्यवर तसेच जनता उपस्थित होती. या महापत्रकारपरिषदेच्या सुरुवातीलाच निवेदन करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर तिखट शब्दात हल्लाबोल केला.
खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या १० वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, त्यामुळे मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही संजय राऊतांनी दिले आहे. जनता न्यायालय... सत्य ऐका आणि विचार करा... अशा टॅगलाईनने ही पत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमके झालेय? हे सांगण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेतून होत आहे. यावेळी, सर्वप्रथम प्रस्तावना करताना संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य करताना कठोर शब्दात टीका केली.
न्यायमूर्तीच्या भूमिकेत आज महाराष्ट्राची जनता आहे, शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभा अध्यक्ष म्हणजेच लवाद राहुल नार्वेकरांनी दिला. त्यानंतर, जागोजागी त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या. त्यांच्या तिरडीवर घालून यात्रा निघाल्या. कारण, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या लवादाने कोणताही मागचा-पुढचा विचार न करता, चोर व लफंग्यांच्या हातात दिली. त्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्र खदखदतोय. या लवादाना दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असा निर्णय आहे. या लवादाला मोदीबिंदू झाला असेल म्हणून त्यांना काही पुरावे समजले नसतील, असे म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकरांवर बोचऱ्या शब्दात टीका केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल केला. आम्ही ईमानदारीने लढलो, तुम्ही बेईमानदारीने जिंकलात, असेही राऊत यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान
महापत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह दिल्लीतील दिग्गज वकीलही आहेत. देशातील कोणत्याही पत्रकाराने यावे आणि प्रश्न विचारा. सगळ्यांची उत्तर दिली जातील. राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिले नाहीत, मात्र आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.