'...तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 02:09 PM2024-03-20T14:09:32+5:302024-03-20T14:10:46+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला आहे.
NCP ( Marathi News ) : 'लोकसभा मतदार संघात जर महायुतीचा धर्म तोडत राहिले तर शिवसेना ज्या मतदार संघात लढणार आहे, तिथे राष्ट्रवादी महायुतीचा धर्म तोडू शकतात', असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतील लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात टीका सुरू केल्या आहेत. मतदार संघात लोकसभा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकही झाली होती, यानंतरही शिवतारे यांनी निवडणूक लढणार असंच जाहीर केले आहे.
अजित पवारांची आदल्या दिवशी भेट, फडणवीसांची बारामतीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक; नाराजी दूर?
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला इशारा दिला. आनंद परांजपे म्हणाले, आम्हाला कोणत्याही प्रकार महायुतीचे वातावरण घडूळ होईल असं वक्तव्य करायचं नाही. सातत्याने विजय शिवतारे वक्तव्य करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्याकडून सातत्याने बारामती लोकसभा मतदार संघाचे वातावरण खराब करण्याचं काम सुरू आहे, असंही आनंद परांजपे म्हणाले.
"संग्राम थोपटे हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद का मिळाले नाही हा प्रश्न त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारायला पाहिजे, असंही परांजपे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभेत प्रचार करत आहे. भाजपच्या चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही दिवसापूर्वी बैठक घेतली. आता महायुतीतील फक्त विजय शिवतारे विरोधात वक्तव्य करत आहेत, असंही आनंद परांजपे म्हणाले.