"राजकारणात सारं काही अनिश्चित"; निलेश लंकेंचं स्पष्टीकरण, मिटकरींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:12 PM2024-03-11T16:12:54+5:302024-03-11T16:14:10+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झाले
मुंबई/अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे खासदार अमोल कोल्हे आणि लंके यांची भेट झाली होती, त्यानंतर लवकरच निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील, असा दावाही कोल्हेंनी केला होता. आता, निलेश लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत स्वत: लंकेंनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, मी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी माझ्या सहकाऱ्यांची इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झाले. मात्र, आता पुन्हा ते घरवापसी करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत बोलताना लंके म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमच्या सहकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, सध्याचं राजकारण हे अनिश्चितेचं बनलं आहे. त्यामुळे, मी लोकसभा निवडणूक लढेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, असे लंकेंनी म्हटले. तसेच, शरद पवार गटातील प्रवेशाबाबतही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली नाही.
''माझं अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही.'', असे स्पष्टीकरण निलेश लंकेंकडून देण्यात आलं आहे. तर, निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आमच्यासोबत आले तर स्वागतच, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
लोकसभेसाठी नाव चर्चेत
आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची घोषणाही केली आहे. जागावाटपावरुन राजकीय पक्षांची कसरत होत असून अहमदनगरच्या राजकारणात अत्यंत रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि खासदार सुजय विखे यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या केंद्रबिंदू ठरला आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव अहमदनगर दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
आमदार मिटकरींची प्रतिक्रिया
आमदार अमोल मिटकरी यांनीही याबाबत माहिती देताना, आमदार निलेश लंके हे कुठेही जाणार नाहीत, असे म्हटले आहे. तसेच, ट्विट करुन नाव न घेता रोहित पवारांवर हल्लाबोलही केला. ''लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय, दादांची साथ सोडू नका'', असं आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ''दादांची साथ सोडु नका. तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे. तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवुन बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहा म्हणुन विनंती'' असे म्हणत मिटकरी यांनी ट्विटरवरुन आमदार रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडु नका.तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे . तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवुन बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहात म्हणुन विनंती 🙏🏼@_NileshLankepic.twitter.com/ED9bAZ6KRp
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 11, 2024