शिवकाळाचा अमूल्य खजिना अनुभवला, अमोल कोल्हे अन् बाबासाहेब पुरंदरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 08:37 PM2020-11-13T20:37:08+5:302020-11-13T20:38:18+5:30
बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्रकार असून शिवाजी महारांजाच्या लढायांसदर्भातील साहित्य निर्मित्तीत त्यांचं योगदान आहे. मात्र, पुरंदरे यांनी इतिहास चुकीचा लिहिल्याचाही आरोप काही संघटनांकडून त्यांच्यावर करण्यात आला आहे
मुंबई - शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवशाहीर आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच, या भेटीदरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती दिल्याचेही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.
बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्रकार असून शिवाजी महारांजाच्या लढायांसदर्भातील साहित्य निर्मित्तीत त्यांचं योगदान आहे. मात्र, पुरंदरे यांनी इतिहास चुकीचा लिहिल्याचाही आरोप काही संघटनांकडून त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेच पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केला होता. मात्र, आज राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांची भेट घेतल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशिर्वाद घेतले.यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्वराज्यजननी जिजामाता मालिका,आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी ‘शिवगंध’ पुस्तक त्यांना दिले आणि त्यांच्याकडून ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ ही दिवाळी पुस्तक भेट मिळाली. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण!, असे ट्विट अमोल कोल्हेंनी केले आहे.
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशिर्वाद घेतले.यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले. pic.twitter.com/kRiMx3HKp4
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 13, 2020
कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला. 17 वर्षाचे असताना त्यांनी शिवाजी महारांजावर गोष्टी लिहिल्या. या गोष्टी ‘ठिणग्या’ नावाच्या पुस्तकाच्या रुपात सर्वांसमोर आल्या. यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘नारायण राव पेशवा’ यांच्यावर ‘केसरी’ नावाचे पुस्तक लिहिले. यासोबतच पुरंदरेंनी लिहिलेले ‘जाणता राजा’ नाटकही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहे. या नाटकाचे हिंदीतही अनुवाद करण्यात आले आहे. फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरसाकर दिला होता.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची घोषणा केली होती. बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड आहे. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असून लाख रुपये रोख, 10 लाख मानपत्र, शाल-श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्य शासनाच्यावतीने 1997 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन वाद
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रभरात वादाची लाटच उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडने बाबासाहेबांना देण्यात येणार्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला कडाडून विरोध केला. तर मनसे आणि शिवसेनेनं जोरदार समर्थनं केलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या पुढे जाऊन भूमिकाही मांडली होती. एवढंच नाहीतर पुरस्काराच्या काही तासांआधीही राष्ट्रवादी आणि जिजाऊ बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता.