राज्यात सरकार स्थापन करण्याचा आमचा गनिमी कावा फसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 04:03 AM2019-12-08T04:03:50+5:302019-12-08T05:55:54+5:30

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

The experiment to establish our government was a failure - Devendra Fadnavis | राज्यात सरकार स्थापन करण्याचा आमचा गनिमी कावा फसला!

राज्यात सरकार स्थापन करण्याचा आमचा गनिमी कावा फसला!

Next

मुंबई : लोकांनी महायुतीला मतदान केले होते. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला दूर ठेवण्याचा तीन पक्षांचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे आम्ही अजित पवार यांच्या मदतीने गनिमी काव्याने सरकार स्थापन केले. मात्र, आमचा हा गनिमी कावा फसला, अशी स्पष्ट कबुली विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय योग्य होता की नाही हे काळच ठरवेल. कदाचित, हा निर्णय चुकीचा ठरेल. एक मात्र नक्की की, आमचा सरकार स्थापनेचा गनिमी कावा फसला. अजित पवार यांनी आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र दिले होते. आमदारांशी संपर्कही करून दिला. त्यानंतर नेमके काय झाले, हे अजित पवारच सांगू शकतील. सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव करण्याचे आदेश दिल्यानंतर ते मला भेटले आणि त्यांनी मला जमणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मी लगेच राजीनामा दिला.

मी त्यांना फारसे प्रश्न विचारले नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. जे काही आहे, ते कमावण्यासाठीच आहे़ त्यामुळे मला गर्व असा कधीच नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता़ ही कवितेची साधीशी ओळ आहे.

विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ भावली़ त्यामुळे सर्वत्र पसरली. ‘मी पुन्हा येईन’मध्ये गर्व वा दर्प नव्हता. जनतेची सेवा करण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ अशी माझी भावना होती. गेल्या पाच वर्षांमध्ये मी एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली. याबाबत मी समाधानीही आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. पहिलवान कोण, यावरून देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्यात जुगलबंदी रंगली होती़ मात्र, मला माझी क्षमता माहिती आहे़ मी कधीही स्वत:च्या नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली. मी कायमच स्वत:च्या मर्यादा व क्षमता समजून काम केले, असे फडणवीस यांनी नमूद केले.

सरकार टिकेल का, हे काळच ठरवेल 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर भाजप हरला आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही लढविलेल्यांपैकी ७० टक्के जागा मिळविल्या आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता, पण आमच्यापेक्षा कमी जागा मिळविणाऱ्यांनी एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. नवे सरकार किती काळ तग धरेल, हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The experiment to establish our government was a failure - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.