'अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून, या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवलं हे सिद्ध होते'; नाना पटोलेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:25 PM2024-07-25T15:25:11+5:302024-07-25T15:27:38+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा.
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत आपल्या विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावर ‘पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी महाजन यांना विचारल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली.
अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, वित्तमंत्री अजित पवार म्हणतात पैसे आणू कुठून, या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवलं हे सिद्ध होते, असा टोला पटोले यांनी लगावला. कॅबिनेट बैठकीत अशी चर्चा होते, पैसे आणायचे असल्यास राज्यातील जमिनी विकाव्या लागतील, अशा चर्चा होतात. राज्य या लोकांनी गहाण टाकले आहे, हे आम्ही आरोप करत होतो पण आता यावरुन वस्तुस्थिती दिसत आहे. विकासाच्या नावाने पैसे घेतले, विकास या लोकांचा झाला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती असेल हे लक्षात येते. या सरकारमध्ये कोण सर्वात जास्त पैसे खातो यावर स्पर्धा लागली आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम सुरू
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर बोलताना पटोले म्हणाले, देशात मोदी सरकार आल्यापासून राजकारणाची स्थिती बदलली, जे सरकार विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले.ईडीचा वापर केला, पण सत्तेत सोबत गेले त्यांना क्लीनचिट मिळाली. त्यामुळे अनिल देशमुख बोलले हे खरे असतील. एकनाथ शिंदे आणि टीम हे ईडीच्या नजरेत होती, वायकर सांगतात मी नाईलाजने शिंदे गटात आलो यावरुन समजते, असंही पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर टीका
नाना पटोले म्हणाले, राज्याचे गृहमंत्री तुम्ही आहे तुम्हाला कोणी थांबवलं, वस्तुस्थिती मांडली पाहिजे. तुम्ही व्हिडीओ दाखवा. ड्रग माफियाला हॉटेल जेल मध्ये 5 स्टार व्यवस्था आहे, गृहमंत्री पदाचा उपयोग विरोधकांना धमक्या देण्यासाठी करत आहेत, असंही पटोले म्हणाले.