ओरिजनल ‘राष्ट्रवादी’ कोणती आणि कोणाची, हे आधी तपासणार; राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:33 AM2023-07-04T06:33:25+5:302023-07-04T06:34:09+5:30
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत
- अतुल कुलकर्णी
मुंबई : आपल्याकडे अद्याप राष्ट्रवादीत फूट पडल्याची कोणतीही कागदपत्रे किंवा दावे-प्रतिदावे आलेले नाहीत. आजतरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्ष बनल्याचे दिसते. त्यामुळे ओरिजनल पक्ष कोणता आणि कोणाचा?, हे आधी तपासावे लागेल. त्यानंतरच पुढील गोष्टी होतील, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याअनुषंगाने त्यांना काही थेट प्रश्न विचारले. त्याची त्यांनी दिलेली उत्तरे अशी...
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला काही पत्र दिले आहे का? असेल तर कधी दिले?
त्यांनी सदस्यांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. माझ्या शासकीय बंगल्यावर काल रात्री (रविवारी मध्यरात्री) एक ते दीडच्या सुमारास ती मला मिळाली. मी ती सचिवालयात नियमानुसार तपासण्यासाठी पाठवली आहे, त्यांनी केलेली याचिका विधिमंडळाच्या नियमात आहे की, नाही त्याबद्दल विधिमंडळ सचिवांचे मत आपण मागवले आहे.
अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडून आपल्याला काही पत्र आले आहे का? असेल तर कधी?
विधान भवनात आज काही प्रेझेंटेशन्स आपल्याकडे आले आहेत. त्यात वेगवेगळ्या नेत्यांची पत्र आहेत. या दोघांकडूनही कालपासून काही पत्र आली आहेत. मात्र, ती विधिमंडळात आजच्या (३ जुलै) तारखेने रेकॉर्डवर घेतली आहेत.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचे तुमच्यासमोर आले आहे का?
पक्षात फूट पडली, असे कोणीही आपल्याला कळवलेले नाही. आजतरी आमच्या रेकॉर्डवर राष्ट्रवादी हा एकच पक्ष आहे. त्यामुळे तो सत्तारूढ आहे की विरोधी, हा पहिला प्रश्न माझ्यासमोर आहे. कोणता पक्ष, कोणाचे प्रतिनिधित्व करतो, हे तपासावे लागेल. जो ग्रुप किंवा जी व्यक्ती हा पक्ष आपलाच आहे, असा दावा करत आहे, तो खरा की खोटा? मूळ पक्ष त्यांचा आहे की नाही? या गोष्टी आपण तपासून घेऊ. आज तरी राष्ट्रवादी एक पक्ष म्हणून दिसत आहे, जो सत्ताधारी पक्षात आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांकडे किती आमदार आहेत, याची आकडेवारी आपल्याला मिळाली आहे का?
अशी कोणतीही आकडेवारी मला दोघांकडूनही मिळालेली नाही. कोणतेही संख्याबळ माझ्यासमोर नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आजतरी माझ्या लेखी एकच पक्ष आहे.
विरोधी बाकावरील पक्षाने सत्ताधारी पक्षात जाताना कोणाला कळविण्याची गरज असते का?
सभागृहात बहुमत सिद्ध करायचे असेल किंवा कोणत्या पक्षाकडे किती सदस्य आहेत, हा प्रश्न उद्भवत असेल, त्यावेळी हे कळवण्याची गरज असते. सत्ताधारी पक्षात ज्या पक्षाला जायचे आहे त्याने त्याच्या संख्याबळासह राज्यपालांकडे यादी द्यायला हवी; मात्र आज तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीने सरकारमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय पक्ष म्हणून घेतला आहे.
आधी जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे प्रतोद म्हणून नेमणूक केली. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नेमणूक झाली. म्हणून तुम्ही कोणाचा प्रतोद मान्य करणार?
दोघांचेही दावे आले तर कोणता प्रतोद (व्हिप) ओरिजनल पक्षाला रिप्रेझेंट करतो, हे तपासण्यासाठी ओरिजनल पक्ष कोणता हे सगळ्यात आधी तपासावे लागेल. त्यानंतर त्या पक्षाचा नेता कोण, हे तपासल्यानंतर त्या नेत्याने कोणाचे नाव प्रतोद म्हणून दिले, हे तपासले जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर तुम्ही निर्णय कधी देणार?
त्याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. त्या ठिकाणी देखील ओरिजनल पार्टी कोणाची हे अजून स्पष्ट झालेले नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडून पक्षांचे तपशील मागवले आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय दिला जाईल.