मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलात गेलो होतो, राष्ट्रवादीचे 'ते' आमदार सांगतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:43 PM2019-11-25T19:43:37+5:302019-11-25T20:04:45+5:30
आम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या
मुंबई - राज्यातील आमदारांचे मुक्कास सध्या पंचतारांकित हॉटेलमध्येच असल्याचं दिसून येतंय. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे आपल्या पक्षाचा आमदारा आपलाच राहावा, यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये असून तिथेच बैठका होत आहेत. राष्ट्रवादीचे 4 ते 5 आमदार दिल्लीला रवाना झाले होते. या आमदारांनाही पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील एका आमदाराने मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यांच सांगितलंय.
आम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलो होतो, एवढं मोठं हॉटेलही मी पहिल्यांदाच जवळून पाहिलं, असे राष्ट्रवादीच्या बेपत्ता आमदारांपैकी एक असलेल्या नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्लीतून पंचतारांकित हॉटेलमधून ते शरद पवारांच्या दिल्ली निवास्थानी पोहचले. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना धक्कादायक घटनाक्रम उघड केला.
शुक्रवारी रात्री आम्हाला मुंडेच्या बंगल्यावरुन फोन आला, बैठकीसाठी सकाळी बोलविलं. सकाळी बंगल्यावर आम्ही गेलो, 5 मिनिटात आम्हाला गाड्यात बसविले, आम्हाला सांगण्यात आले की, अजितदादांना भेटण्यासाठी जायचं आहे, राजभवनात गेलो, तेव्हा भाजपाच्या नेत्यांना पाहून धक्का बसला, शपथविधी झाला, आम्हाला परत गाड्यात बसविले तिथून आम्हाला हरियाणाच्या एका हॉटेलला नेण्यात आलं. शरद पवारांना सांगूनच हे घडत आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र गैरसमजातून हा प्रकार घडला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईहून काही कार्यकर्त्यांनी आम्हाला सोडविलं. कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या गराड्यात आम्हाला ठेवण्यात आलं होतं. आमच्याकडून बाहेर निघण्याचे प्रयत्न सुरु होते. पण, आम्ही पळून गेलो असं भासविण्यात आलं. शरद पवारांवरील निष्ठा कधीही कमी होणार नाही, माझी छाती फोडली तरी शरद पवारच दिसतील. ज्यांच्यावर निष्ठा ठेवली त्याचा विश्वासघात करणार नाही, असं स्पष्टीकरण आमदार नरहरी झिरवळ यांनी दिलं आहे.
दरम्यान, नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आदिवासी बहुल भागातील लोकांचे प्रतिनिधित्व हे आमदार करत आहेत. त्यामुळे, आम्ही नेहमीच निष्ठावान राहूनच काम करणारे असून सत्तेसाठी किंवा पैशासाठी नितिमत्ता सोडत नसल्याचे झिरवळ यांनी म्हटलंय. झिरवळ यांची एकूण संपत्ती साधारण 1 कोटी 90 लाख एवढी आहे.