मुंबई महानगरपालिकेवर तिरंगा फडकवणार - भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:58 AM2021-02-03T02:58:39+5:302021-02-03T02:59:19+5:30
Mumbai Municipal Corporation News : आतापासूनच एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेसशिवाय महापौर नाही
मुंबई : आतापासूनच एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेसशिवाय महापौर नाही, असा ठाम विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकताच जोगेश्वरीत व्यक्त केला.
मुंबईतील प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी लवकरच प्रत्येक वाॅर्डात पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती त्यांनी जोगेश्वरीतील उत्तर पश्चिम कार्यकर्ता मेळाव्यात दिली. यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व बलदेव खोसा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरांत पोहोचत आहेत. आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घराघरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागा, असा स्वबळाचा पुनरुच्चार भाई जगताप त्यांनी या मेळाव्यात केला.
मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला पोहोचली आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅस सिलिंडर ७०० रुपये झाले, पेट्रोल ९३ रुपयांवर पोहोचले, भाजप जातीयवाद, भाषावाद व प्रांतवाद पसरवतात, काँग्रेस नेहमी सर्वधर्मसमभाव विचाराने चालते, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाते, भेदभाव करत नाही. इस्रायल दूतावासात बॉम्बस्फोट झाला, या प्रकरणात दिल्ली पोलिसांचे व गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गृहमंत्री अमित शहाचे अपयश असून, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी चरणसिंग सप्रा यांनी यावेळी केली.
माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, मनपा निवडणूक समोर आहे. काँग्रेसचे रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक निवडून आले पाहिजेत.