दादांकडे ‘तिजोरीच्या चाव्या’ देण्यास भाजपामधूनही विरोध;मविआ सरकारमध्येही झालेली धुसफूस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:20 AM2023-07-05T07:20:26+5:302023-07-05T07:23:25+5:30
महाविकास आघाडी सरकारमध्येही झाली हाेती धुसफूस
- यदु जोशी
मुंबई : अजित पवार उपमुख्यमंत्री झाले खरे पण त्यांना कोणती खाती मिळणार या बाबतची अनिश्चितता कायम असताना आता त्यांना वित्त खाते देण्यास शिवसेनेपाठोपाठ (शिंदे गट) भाजपच्या आमदारांनीही तीव्र विरोध दर्शविला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडे वित्त खाते होते. ते शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांची कामे मंजूर होवू देत नाहीत, त्यासाठी पुरेसा निधी देत नाहीत अशा तक्रारी होत्या. सरकारमधून बाहेर पडण्यामागे शिंदे यांनी हेही एक कारण दिले होते. आता पवार यांना वित्त खाते देवू नये अशी गळ शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातली आहे.
अजित पवार यांची वित्त मंत्री म्हणून कामाची शैली, आपल्या मर्जीतील आमदारांना जादा निधी देणे, याबाबत पूर्वीही धुसफूस राहिली आहे. आता शिवसेनेपाठोपाठ भाजपच्याही आमदारांनी वित्त मंत्री म्हणून पवार नकोत असा आग्रह धरल्याची माहिती आहे. काही आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खाते काढून ते अजित पवार यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात अचानक राष्ट्रवादी आल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात आम्ही आमच्या जिल्ह्यात लढतो, आता त्यांच्यासोबत कसे राहायचे असा सवाल भाजपचे आमदार खासगीत करत आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे अन् शिवसेना मंत्री शांत, शांत
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांच्या समावेशानंतर मंगळवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतील चित्र ताणतणावाचे नव्हते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् शिवसेनेचे मंत्री बरेचसे शांत, शांत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मूड नेहमीप्रमाणे होता. त्यांनी वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाद दिली. शिंदे आणि अजित पवार यांच्या मध्ये फडणवीस बसले होते. शिंदे मात्र फारसे बोलत नव्हते. एक-दोन निर्णयांवरून काही प्रश्न उपस्थित झाले, तेव्हाच शिंदे बोलले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तीन-चार विषयांवर आक्रमकपणे बोलले. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये फारसा संवाद दिसला नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे स्वागत मुनगंटीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.