माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:50 PM2024-09-19T12:50:25+5:302024-09-19T12:51:30+5:30

संजय पांडे हे लोकसभा निवडणुकीत उभे राहणार होते, मात्र आता ते अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey to join Congress; Uddhav Thackeray headache will increase cause of Varsova Seats | माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?

मुंबई -  येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडेल. संजय पांडे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते राजकीय मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय पांडे हे मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या जागेवर सध्या भाजपाच्या आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीही संजय पांडे अपक्ष निवडणुकीला उभे राहतील अशी चर्चा होती. माजी आयपीएस अधिकारी असलेले संजय पांडे हे कायम चर्चेत राहिलेले आहेत. उत्तर भारतीय चेहरा म्हणून संजय पांडे काँग्रेसमध्ये सहभागी होतील. संजय पांडे यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध आहेत. 

वर्सोवा मतदारसंघात रस्सीखेच

वर्सोवा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजूल पटेल यादेखील उत्सुक आहेत, मागील निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. पटेल यांना चांगली मतेही मिळाली होती. २००९ साली या मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली होती. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या काळात भाजपाच्या भारती लव्हेकर या मतदारसंघात निवडून आल्या. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत ३२ हजार मते घेतली होती. 

आता वर्सोवा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून त्यांची वर्सोव्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीत कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. २००९ मध्ये काँग्रेस उमेदवार बलदेव खोसा यांनी शिवसेना उमेदवार यशोधर फणसे यांना १२ हजार मतांनी पराभूत केले होते. त्यामुळे वर्सोवा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी ठाकरे प्रयत्नशील आहे. त्यात संजय पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.  

संजय पांडे वादात

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होते. मविआ सरकारच्या काळात ते निवृत्त झाले. परंतु मधल्या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना १९ जुलै २०२२ रोजी अटक केली होती. संजय पांडे यांच्या कारकिर्दीत अनेक घटना घडल्या. त्यावरून मविआ सरकारवर विशेषत: उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आले होते.  
 

Web Title: Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey to join Congress; Uddhav Thackeray headache will increase cause of Varsova Seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.