आगामी निवडणूक ही ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ - मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:45 AM2018-11-05T06:45:16+5:302018-11-05T06:45:43+5:30

निवडणुका जवळ आल्या की, नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करायचे उद्योग सुरू आहेत.

The forthcoming election is 'Constitution Against Manusmriti' - Mallikarjun Kharge | आगामी निवडणूक ही ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ - मल्लिकार्जुन खर्गे

आगामी निवडणूक ही ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ - मल्लिकार्जुन खर्गे

Next

मुंबई  -  निवडणुका जवळ आल्या की, नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करायचे उद्योग सुरू आहेत. २०१९ची निवडणूक ही संविधान विरुद्ध मनुस्मृती असणार आहे, असे सांगत काँगे्रस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केले.
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई काँग्रेसने ‘संविधान बचाव परिषद’चे आयोजन केले होते. या वेळी खर्गे म्हणाले की, संविधानामुळे देशातील अस्पृश्यता संपली. मनुस्मृतीचे रक्षण करायचे की, संविधानाचे याचा निर्णय २०१९च्या निवडणुकीने होणार आहे. भाजपा सरकारच्या चार वर्षांच्या काळात महिला, दलित आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचार वाढ झाली आहे. काँग्रेसने मात्र कायमच नागरिकांना मूलभूत अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य दिले. भाजपाच्या काळात विकास तर झालाच नाही, पण हुकूमशाही पद्धतीने निवडणूक आयोग, आरबीआय, सीबीआय, संरक्षण खात्यांची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपा सरकारला हरविण्याचे उद्दिष्ट सर्वांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे आवाहन खर्गे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
संविधान हा भारताचा जीव आहे आणि तोच सध्या अडचणीत सापडल्याचे संजय निरुपम म्हणाले. देशाच्या नीतीमूल्यांवर रोज हल्ले होत आहेत. काय बोलायचे, काय खायचे, काय कपडे घालायचे, हे भाजपा सरकार ठरवत आहे. न्यायपालिका, विद्यापीठ, दलित समाज, अल्पसंख्याक, व्यापारी वर्ग, सीबीआय यांच्यावर रोज हल्ले होत आहेत. संविधान वाचविण्यासाठी विद्रोहाची वेळ आल्याचे सांगून निरुपम म्हणाले की, संविधानाच्या मुद्द्यावरून दिवाळीनंतर मुंबई काँग्रेस आक्रमक आंदोलन करणार आहे. या परिषदेत देशाचे संविधान वाचविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सर्व काँग्रेस नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी संविधान वाचविण्याची प्रतिज्ञाच घेतली. या वेळी खर्गे, निरुपम यांच्यासह नितीन राऊत, राम पंडागळे, खा. हुसेन दलवाई, माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी आ. बाबा सिद्दीकी यांची भाषणे झाली.

देवरा, दत्त यांची अनुपस्थिती

या कार्यक्रमास माजी मंत्री मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त अनुपस्थित होते. आपल्याच मतदारसंघातील कार्यक्रमाकडे दत्त यांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडेच प्रिया दत्त यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावरून हाकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून प्रिया दत्त पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: The forthcoming election is 'Constitution Against Manusmriti' - Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.