'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:05 PM2021-11-16T14:05:57+5:302021-11-16T14:10:30+5:30
कंगनाच्या विधानसंदर्भात खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एका शब्दात दुर्दैव अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या विधानावरुन संताप व्यक्त होत आहे. देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्या अगोदरचं स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळालं होतं, असं वादग्रस्त विधान कंगनाने केलं होतं. कंगनाच्या या विधानावरुन देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. कंगणा रणौतला देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि या देशातून तिची हाकालपट्टी केली पाहिजे, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं. तर, खासदार अमोल कोल्हेंनीही कंगनाच्या विधानावर भाष्य केलंय.
कंगनाच्या विधानसंदर्भात खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एका शब्दात दुर्दैव अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली. तसेच, ज्या हजारो देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अवघ्या 23 व्या वर्षी फासावर असणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांचं बलिदान, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. गेल्या 75 वर्षात देश ज्या उत्क्रांतीतून गेलाय, त्या अनुषंगाने हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केलाय, त्यांचा हा अपमान आहे. ज्यांनी हे विधान केलंय, त्यांनी आत्मपरिक्षण करावं. ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही, त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये, देशाचा अपमान करू नये, असे डॉ. खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
विक्रम गोखलेंनाही सुनावलं
कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. तसेच, मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अभिनेता विक्रम गोखलेंना प्रत्युत्तर दिलंय.
देशातून तडीपार करा - बच्चू कडू
ती अभिनेत्री जोपर्यंत नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला देशातून तडीपार केले पाहिजे असं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. स्वातंत्र्य सेनानींवर केलेल्या वक्तव्याविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तिची या देशातून हाकालपट्टी केली पाहिजे. तिचा पुरस्कारही परत घेण्याची निश्चितच गरज आहे. पण, या देशात तसे होत नाही. प्रत्येक गोष्टीवर राजकीय मुद्द करून त्याची पुन्हा खरी आणि खोटी बाजू असे निर्माण केले जाते, हे अत्यंत चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.