Ajit Pawar: भावी मुख्यमंत्री! एकच वादा, अजित दादा; जयंत पाटलांच्या बॅनरशी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:20 PM2023-02-21T15:20:52+5:302023-02-21T15:38:28+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा गेल्या आठवड्यात वाढदिवस होता
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध पाहायला मिळतं. त्यामध्ये, अजित पवारांवर प्रेम करणारा, त्याचा चाहता कार्यकर्ता वर्ग कायम अगेसर असतो. त्याच दादा प्रेमातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता अजित पवार यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हा बॅनर झळकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावानेही गेल्याच आठवड्यात असे बॅनर लागले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा दादा आणि पाटील यांच्या समर्थकांमधली शीतयुद्ध सोशल मीडियातून समोर आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा गेल्या आठवड्यात वाढदिवस होता, या वाढदिवसानिमित्त राज्यभरात बॅनर लावण्यात आले. मुंबईतही बॅनर लावण्यात आले. मात्र, मुंबईत लागलेल्या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बॅनर्सवर आमदार जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. आता, राष्ट्रवादीचे दबंग नेते अजित पवार यांचेही बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या बॅनवरवर दिसून येतो. विशेष म्हणजे थेट प्रदेश कार्यालयाबाहेरच हा बॅनेर झळकल्याने याची चांगलीच चर्चा सुरूय.
घराबाहेर लागले होते बॅनर
दरम्यान, आमदार जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर हे बॅनर लावण्यात आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे बॅनर्स लावण्यात आले. या बॅनरवर जयंत पाटलांचा उल्लेख बॉस असाही करण्यात आला होता.
... तर मुख्यमंत्री हे शरद पवारच ठरवतील
दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा मला विश्वास आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे संख्याबळावर ठरेल. तसंच संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्री कोण असेल हे शरद पवारच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल," असं जयंत पाटील म्हणाले होते.