बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 07:28 AM2024-10-22T07:28:50+5:302024-10-22T07:29:35+5:30

ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळणार का, हा औत्सुक्याचा विषय झाला आहे

Gaikwad insists on Dharavi seat for sister; Leaders say - give candidacy to workers! | बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली नसली, तरी पक्षांतर्गत पातळीवर नेते मंडळी आपल्या नातेवाइकांना तिकीट मिळावे, यासाठी जोरदार फिल्डींग लावताना दिसत आहेत. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी धारावी विधानसभा मतदारसंघातून आपली बहीण ज्योती गायकवाड यांच्यासाठी आग्रह धरला असून, पक्षातील काही नेते मात्र त्याला विरोध करत आहेत.

मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी वर्षा गायकवाड, माजी अध्यक्ष अशोक जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांची समिती तयार करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत धारावी मतदारसंघाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी वर्षा गायकवाड यांनी आपली बहीण ज्योती यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्या बैठकीत अशोक जगताप यांनी ज्योती यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. 

उत्तर-मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड लोकसभेत निवडून गेल्या. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून ज्योती या गायकवाड कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. अनेक कार्यक्रमांतून त्यांचे बॅनर्स लावले जात आहेत.

कोंडविलकर, अहिरे चर्चेत

ज्योती गायकवाड अलीकडेच सक्रिय झाल्या असल्यामुळे त्यांच्याऐवजी धारावी मतदारसंघात आतापर्यंत काम करणाऱ्या संदेश कोंडविलकर आणि सुनील अहिरे यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव जगताप यांनी मांडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळणार का, हा औत्सुक्याचा विषय झाला आहे.

Web Title: Gaikwad insists on Dharavi seat for sister; Leaders say - give candidacy to workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.