Anant Chaturdashi 2018 : गणरायाला आज मुंबईकर देणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:20 AM2018-09-23T06:20:04+5:302018-09-23T09:02:49+5:30

पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त रविवारी निरोप देणार आहेत.

Ganesh Chaturthi 2018: Message to Ganarka today will be delivered to Mumbaikar | Anant Chaturdashi 2018 : गणरायाला आज मुंबईकर देणार निरोप

Anant Chaturdashi 2018 : गणरायाला आज मुंबईकर देणार निरोप

Next

मुंबई : पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त रविवारी निरोप देणार आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात होईल. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त नाचताना दिसण्याची शक्यता जास्त आहे.
विसर्जन स्थळांशिवाय लालबाग, काळाचौकी, परळ येथे मोठ्या संख्येने सकाळपासून गणेशभक्त जमा होतील. लालबागमार्गे जाणाऱ्या शेकडो गणेशमूर्तींचे दर्शन घेण्याची ही पर्वणी असते. त्यात मानाचे गणपती मानल्या जाणाºया गोदी कामगारांच्या कॉटनग्रीनच्या राजाची विसर्जन मिरवणूक असेल. कॉटनग्रीनच्या राजानंतर मुंबईचा राजा गणेशगल्ली आणि त्यामागून लालबागचा राजा निघेल. याशिवाय टाळ्यांच्या तालावर शिस्तबद्धपणे निघणारी चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक नेहमीच आकर्षण ठरते. तर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत नृत्याचा मान असलेल्या कोळी समाजाचे नृत्य कॅमेºयात टिपण्यासाठी मोठ्या संख्येने छायाचित्रकार गर्दी करतील.
मुंबईच्या राजासह लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टीसाठी येथील श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाने भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांसह रामदास स्वामींची प्रतिकृती तयार केलेली आहे. तर विसर्जन स्थळांवर कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही, तसेच येथील सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेनेही विसर्जनाचे नियोजन केले असून कोणत्याही प्रकारची अडचण भक्तांना होणार नाही, याची काळजी घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

खड्ड्यांसह मेट्रोचे विघ्न कायम
विसर्जन मार्गांवर असलेल्या खड्ड्यांमुळे यंदाही गणेश मंडळांना बाप्पाचे विसर्जन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मुळात मेट्रोच्या मार्गातील बॅरिकेड्स दूर करण्याची घोषणा मेट्रोने केली होती. गणेश मंडळांना सहकार्य करण्याची भूमिकाही मेट्रोने घेतली होती. मात्र मेट्रोच्या बहुतेक मार्गांमधील बॅरिकेड्स शनिवारपर्यंत तसेच होते. त्यामुळे याशिवाय पावसाने दडी मारल्यानंतरही विसर्जन मार्गांतील खड्डे बुजवण्यात मनपा व राज्य प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र शनिवारपर्यंत होते. त्यामुळे बाप्पांना रविवारी खड्ड्यांसह मेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्समधून मार्ग काढतच मुंबईकरांचा निरोप घ्यावा लागणार आहे.

गिरगाव चौपाटीवर छायाचित्रणास भाविकांना बंदी

मुंबई : गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी येणाºया गणेशमूर्ती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. हा सोहळा मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी जणू स्पर्धा लागते. काही जण बाप्पासोबत सेल्फी घेताना दिसतात. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. सोबतच विसर्जित मूर्तींच्या फोटोमुळे भावना दुखावल्या जाण्याचीही भीती असते. म्हणूनच विसर्जित मूर्तींचे फोटो मोबाइलद्वारे काढण्यास किंवा छायाचित्रण करण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे, तरीही कोणी असे करताना दिसल्यास मोबाइल जप्त होण्याची शक्यता आहे.
मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना अनेक अडचणी येतात. मोठी भरती असल्यास काही वेळा समुद्रात थोड्या अंतरावर गेल्यानंतर गणेशमूर्ती पाण्यात ढकलण्यात येते. अशा वेळी फोटो काढल्याने किंवा व्हिडीओमुळे भाविकांच्या भावना दुखाविल्या जातात, शिवाय फोटो काढताना अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळेच भाविकांना बंदी घालण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
पोलिसांचा निर्णय, पालिकेचे सहकार्य
गिरगाव चौपाटी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव गिरगाव चौपाटीवर फोटो काढता येणार नाहीत. विसर्जन सोहळ्यास भाविक फोटो काढताना किंवा छायाचित्रण करताना आढळल्यास त्याचा मोबाइल जप्त करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हा निर्णय पोलिसांचा असून, पालिका सहकार्य करीत आहे. भाविकांना सूचित करणारे फलक चौपाटीवर लावले असल्याचे, डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

सायन तलाव विसर्जनासाठी बंद

मुंबई : सायन येथील ८० वर्षांपूर्वीच्या सायन तलावात दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. मात्र पर्यावरणाचे कारण देत पालिका प्रशासनाने हा तलाव पुढच्या वर्षीपासून विसर्जनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याविरोधात तीव्र पडसाद उमटत असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
या तलावात धारावी, चुनाभट्टी, प्रतीक्षानगर, सायन परिसरातील सुमारे नऊ हजार गणेशमूर्तींचे दरवर्षी विसर्जन केले जाते. मात्र आता तलाव बंद करण्यात येणार असल्याची नोटीस प्रशासनाने तलाव परिसरात लावल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तलाव बंद झाल्यास पुढील वर्षीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन कुठे करणार, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
पालिकेने हा निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात का घेतले नाही, असा सवाल करीत हा तलाव बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आता शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे.
केमिकलमुळे मासे मरतात, पर्यावरणाचे नुकसान होते, हे मान्य असले तरी बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. त्यासाठी अन्य उपाययोजना हाती घ्यायला हव्या. त्यामुळेच अन्य उपाय तातडीने हाती घेऊन तलावाजवळ लावलेली नोटीस काढून तलाव बंद केला जाणार नाही, अशी नोटीस तेथे लावावी, अशी मागणी सातमकर यांनी केली आहे.
कासव, मासे मरतात
विसर्जनावेळी केमिकलमुळे तलावताील कासव, मासे मरतात, असे पालिकेचे म्हणणे आहे. असे असेल तर गणेश विसर्जनासाठी या तलावाच्या बाजूला कृत्रिम तलाव तयार करावा, असे भाजपाच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी सांगितले.
निर्णयावर पुनर्विचार करावा
काही वर्षांपूर्वी हा तलाव बुजवण्याचा घाट घातला जात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केल्याने हा निर्णय प्रशासनाने मागे घेतला. आता पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे सातमकर यांनी निदर्शनास आणले. याची दखल घेऊन हा तलाव ८० वर्षे जुना असल्याने तडकाफडकी बंद करू नये. या निर्णयाचा प्रशासनाने फेरविचार करावा, असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

‘काळोख असलेल्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन करू नका’

मुंबई : गणेशमूर्तींचे विसर्जन काळोख असलेल्या ठिकाणी करू नका, असे आवाहन पालिकेने केले आहे. कारण अशा ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसते. त्यामुळे पाय घसरून पडण्याची किंवा चोरीसारख्या घटना घडण्याची शक्यता असते.
विसर्जन स्थळी अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक तैनात आहेत. स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाइट, स्वागत कक्ष आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही पालिकेने केली आहे.
गिरगाव, दादर, माहिम, जुहू, मार्वे आदी ठिकाणच्या चौपाट्यांवर, तसेच गोराई जेट्टी, पवई तलाव, भांडुपेश्वर कुंड, पूर्व द्रुतगती महामार्गावरचे मोरया उद्यान तलाव, तसेच सायन तलाव इत्यादी ठिकाणी पालिकेने विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. समुद्रकिनारी स्टिंग रे, जेली फिश, वाम या माशांचा धोका असून, या माशांचा गणेशभक्तांना दंश होऊ नये, म्हणून महापालिकेने चौपाटीवर जाताना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही केले आहे.
अतिरिक्त अद्ययावत रुग्णवाहिका चौपाट्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात, विसर्जन स्थळी जाण्यापासून रोखावे, अंधार असलेल्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरिता जाऊ नका. महापालिकेने पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: Ganesh Chaturthi 2018: Message to Ganarka today will be delivered to Mumbaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.