अदानींचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 04:47 PM2023-05-01T16:47:25+5:302023-05-01T16:48:20+5:30

'पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी अन्यथा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल'

Gautam Adani gets GST waived but why not GST on agricultural materials? Congress leader Nana Patole's question | अदानींचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? नाना पटोलेंचा सवाल

अदानींचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? नाना पटोलेंचा सवाल

googlenewsNext

अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही. सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी अन्यथा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? नाना पटोलेंचं सूचक विधान, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, एकीकडे महागाई वाढत असून शेतकरी पिचला जात आहे. भाजपा सरकारने खतांच्या किंमती वाढवल्या आहेत, डिझेल शेतकऱ्याला परवडत नाही, शेती औजारांवर GST लावून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. अदानीचा कोट्यवधी रुपयांचा GST मोदी सरकारने माफ केला आहे पण शेतकऱ्यांकडून मात्र वसूल केला जातो. भाजपा सरकारने शेती साहित्यावरील GST माफ करावा.

शेती औजारांवर GST लावून शेतकऱ्याला लुटले जात आहे. ही लुट थांबवली पाहिजे. शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली २००० रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे, मोदी सरकारची ही योजनाच फसवी आहे. ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्याला हे पैसे मिळत नाहीत ते पैसे बँक कर्जाच्या हप्त्यात वसूल करते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात खारघरमध्ये सरकारच्या ढिसाळ नियोजनाने १४ लोकांचा बळ घेतला आहे. तर आता रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीसाठी स्थानिकांवर शिंदे सरकार अत्याचार करत आहे. काँग्रेस पक्ष बारसूच्या जनतेवरील अन्याय सहन करणार नाही. कोकणी माणूस निसर्गप्रेमी आहे, त्या निसर्गावर सरकार घाला घालत आहे. शिंदे सरकारने कोकणातील निसर्ग उद्धवस्त करण्याचे पाप करु नये. विकासाच्या नावाखाली कोकणचे पर्यावरण नष्ट करु देणार नाही. 

रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असताना सरकारला एवढी घाई कशाची झाली आहे? सरकारच्या बगलबच्यांचे खिसे भरण्यासाठी प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे. काँग्रेस नेत्यांनी बारसूच्या जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत. खारघर व बारसूच्या प्रश्नावर लवकरच राज्यपाल यांना भेटणार आहोत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Gautam Adani gets GST waived but why not GST on agricultural materials? Congress leader Nana Patole's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.