१४५ आमदारांचा पाठिंबा आणा अन् मुख्यमंत्री बना; अजित पवारांचा भाजपाला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:01 PM2022-05-05T12:01:26+5:302022-05-05T12:01:55+5:30
मला एका ब्राह्मणाला राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं आहे असं वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना भाजपला जोरदार टोला हाणला आहे.
मुंबई-
मला एका ब्राह्मणाला राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं आहे असं वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना भाजपला जोरदार टोला हाणला आहे. "मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीनं व्हावं असं काही नाही. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जातीची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. अगदी आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. १४५ चं बहुमत आणा आणि मुख्यमंत्री व्हा", असा टोला अजित पवार यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"मुख्यमंत्री होण्यासाठी काही १४५ आमदार आणा आणि राज्याचं प्रमुख व्हा. एखाद्या व्यक्तीच्या पाठिशी १४५ आमदार उभे राहिले तर ती व्यक्ती होईलच की मुख्यमंत्री. मग तुम्ही १४५ आमदार आणा आणि तुम्हाला हवं त्याला मुख्यमंत्री करा", असा निशाणा अजित पवार यांनी भाजपावर साधला.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
"मला एका ब्राह्णाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे," असे वक्तव्य दानवेंनी केले आहे. 3 मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकरदेखील उपस्थित होते. जालन्यात ब्राह्मण समाजाकडून 3 मे रोजी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, "ब्राह्मण समाजातील व्यक्तीला फक्त नगरसेवक, नगराध्यक्ष पदांवर पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पाहू इच्छितो,'' असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले.