अजितदादा, पाणी मागणाऱ्यांना तुम्ही काय बोलला होतात हे विसरलात का?- गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:58 PM2019-08-06T15:58:50+5:302019-08-06T15:59:24+5:30
भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनीही याचा आनंद साजरा करत चक्क डान्स केला
मुंबई- मोदी सरकारनं कलम 370मधील तरतुदी शिथिल करण्यासह जम्मू-काश्मीरचं विभाजन केलं. त्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनीही याचा आनंद साजरा करत चक्क डान्स केला आहे. त्यांच्या नाचगाण्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता गिरीश महाजनांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी डान्स केल्यावर अजित पवारांच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे. अजितदादा, पाणी मागणाऱ्यांना तुम्ही काय बोलला होतात हे विसरलात का?, अशी खोचक टीकाही गिरीश महाजनांनी केली आहे.
तत्पूर्वी अजित पवारांनीही म्हटलं होतं की, पाणी एवढं आलंय आणि काही मंत्री नाचत होते. नाचायचं काम तुमचं नाही, टीव्हीला बघितलं की नाही, काय चाललंय. पाणी आलेलं बघा; नाचताय काय, नाचायचं काम तुमचं नाही, नाचायचं काम नाचणारे करतील, इथे पूर आला आणि मंत्रीमहोदय नाचतात. राज्यात इतर पक्षांच्या यात्रा सुरू असताना राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू आहे. संभाजी राजेंच्या या मालिकेत प्रमुख भूमिका साकारलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राज्यात फिरवत राष्ट्रवादी ही यात्रा काढत आहे. याचदरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीवर बोलताना अजित पवारांनी गिरीश महाजनांवर शरसंधान साधलं.
तर दुसरीकडे पाणी बघितल्यावर माणसाला कळत नाही काय करावं. लोक अडचणीत आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. जनता पुरात आहे, आणि मुख्यमंत्री प्रचारात आहेत. यात्रा महत्त्वाची की महाराष्ट्रातील सामान्य माणूस? असा प्रश्न अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.