‘त्या’ मुलीला मिळाले दत्तक पालकांचे प्रेमळ घर; दुसरे कन्यारत्न स्वीकारणाऱ्या दाम्पत्याचे केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:22 AM2020-01-14T02:22:50+5:302020-01-14T02:23:04+5:30
गेल्या वर्षी १३ जून रोजी जन्मलेल्या या मुलीला तिच्या जन्मदात्या आईने चारच दिवसांनी सोडून दिले होते
मुंबई : पुरुषप्रधान संस्कृतीचा बोलबाला असताना आणि स्वत:ला १४ वर्षांची एक मुलगी असूनही, सहा महिन्यांची आणखी एक चिमुरडी दत्तक घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त करणाºया दिनेश गणपतराव मोहिते आणि जयश्री मोहिते या मुंबईतील दाम्पत्याचे उच्च न्यायालयाने कौतुक केले व हा दृष्टिकोन समाजात रुजविण्याची गरज अधोरेखित केली. न्यायालयाने दत्तकविधान मंजूर करून, त्या अनाथ मुलीला ‘दत्तक पालक’ म्हणून मोहिते यांच्याकडे सुपुर्द केले.
गेल्या वर्षी १३ जून रोजी जन्मलेल्या या मुलीला तिच्या जन्मदात्या आईने चारच दिवसांनी सोडून दिले होते. नंतर मुंबई उपनगर जिल्हा बालकल्याण समितीने सांभाळ करण्यासाठी या मुलीला अंधेरी (प.) येथील सेंट कॅथरिन्स होम या अनाथालयाकडे सोपविले. तेथे तिला ‘गीतिका’ असे नाव देण्यात आले. या मुलीला दत्तक देण्यात काही कायदेशीर अडचणी नाहीत, याची खातरजमा केल्यानंतर तिला दत्तक देण्याचे ठरविण्यात आले. पंतनगर, घाटकोपर (पू.) येथे राहणाºया मोहिते दाम्पत्याने ‘गीतिका’ला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, त्यांनी कायदेशीर दत्तकविधान मंजूर करून घेण्यासाठी सेंट कॅथरिन्स होमसोबत उच्च न्यायालयात अर्ज केला. न्या. गिरीश कुलकर्णी यांनी हा अर्ज मंजूर करून, ‘गीतिका’ ही दिनेश व जयश्री मोहिते यांची दत्तक मुलगी झाल्याचे व यापुढे तिचे नाव ‘अधिरा दिनेश मोहिते’ असे असेल, असे जाहीर केले. अधिरा हिला मोहिते दाम्पत्याची दत्तक मुलगी म्हणून रीतसर जन्मदाखला दिला जावा, असा आदेशही दिला गेला.
मुलीला दिलेले ‘अधिरा’ हे नाव तिला दत्तक घेण्यासाठी मोहिते दाम्पत्य किती अधीर झाले होते, याचे द्योतक आहे. ‘अधिरा’चे संभाव्य दत्तक पालक म्हणून मोहिते दाम्पत्याची योग्यता अनेक परींनी तपासताना, न्या. कुलकर्णी यांनी एक गोष्ट कौतुकाने प्रकर्षाने नमूद केली. मोहिते यांना ‘कृपा’ नावाची १४ वर्षांची स्वत:ची मुलगी असूनही, त्यांनी ‘अधिरा’ला दत्तक घेण्याचे ठरविले. एवढेच नव्हे, तर ‘अधिरा’चा धाकटी बहीण म्हणून स्वीकार करण्यास ‘कृपा’ही तेवढीच उत्सुक असल्याचे त्यांना जाणवले.
मुलींविषयीची आस्था दिसून येते!
विशेष म्हणजे, मोहिते दाम्पत्य आपल्या मुलीचा प्रत्येक वाढदिवस आणि घरातील सर्व सणवार आवर्जून अनाथाश्रमांमध्ये जाऊन साजरे करतात, यावरून त्यांची अनाथ मुलांविषयीची आस्था दिसून येते, याचीही न्यायालयाने नोंद घेतली. तर दुर्दैवाने काही अघटित घडून ‘अधिरा’चे दत्तक माता-पित्याचे छत्र हरपले, तर आपण तिचा तेवढ्याच प्रेमाने सांभाळ करू, अशी लेखी हमीही मोहिते यांचे बंधू सुभाष व वहिनी मयुरा यांनी दिली.